आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये ध्वनी प्रदूषणाचा दणदणाट, पाच वर्षांत सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - झपाट्याने विकसित होणा-या नाशिक शहरात ध्वनी प्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठल्याचे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालातून स्पष्ट झाले आहे. गत पाच वर्षांत बाजारपेठच नाही, तर निवासी भागातही ८२ डेसिबलपेक्षा अधिक आवाजापर्यंत पातळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात नोहाॅर्न डीजेसारख्या दणदणाट करणा-या वाद्यांवर बंदी घालण्याचे उपाय सुचवण्यात आले आहेत.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या नकाशावर नाशिकची ओळख थंड हवामानाचे शांतता क्षेत्र म्हणून आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाढते नागरीकरण, वाहनांची संख्या कोणतेही निमित्त असो अत्यंत कर्णकर्कश्य आवाजात सेलिब्रेशन करण्याच्या फंड्यामुळे शहरातील शांतता धोक्यात आली आहे. त्याचे प्रतिबिंब महापालिकेने दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या ध्वनी प्रदूषण अहवालातून उमटले आहे. शहरात निवासी भागात दिवसा तब्बल ८२ डेसिबल इतकी ध्वनी प्रदूषणाने पातळी गाठल्याचे समोर आले आहे. वास्तविक याठिकाणी ५५ डेसिबल इतकीच ध्वनी पातळी अपेक्षित आहे. रात्रीच्यावेळी ४५ डेसिबल इतकी ध्वनी पातळी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६८ डेसिबल इतक्या उच्चांकी आवाजाची नोंद झाली आहे. बाजारपेठ भागात दिवसा ८८ डेसिबल इतकी ध्वनी पातळी आढळली असून, वास्तविक येथे ६५ डेसिबल इतके आदर्श प्रमाण आहे. रात्रीच्यावेळी ५५ डेसिबल ध्वनीपातळी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६९ डेसिबल इतक्या उंच्चाकी स्वराची सरासरी नोंद आढळली आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक उत्सव, लग्न वा अन्य समारंभामध्ये डीजे तत्सम मोठ्या आवाजातील वाद्यांवर बंदी घालण्याचा उपाय सुचवला आहे. मात्र, कमी आवाजातील वाद्यांना मुभा दिली आहे.

शहरातील हवा मात्र चांगली
घातकवायूंच्या उत्सर्जनामुळे शहरात हवा प्रदूषण वाढल्याची चिंता व्यक्त होत असली तरी, पर्यावरण अहवालात हवेचा दर्जा चांगल्या वर्गवारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

९८ टक्के पाणी शुद्ध
गेल्यापाच वर्षांचा विचार केला तर, नाशिक शहरातील पिण्याच्या पाण्याची टक्केवारी जवळपास ९८ टक्के शुद्ध अशी आढळली आहे. २०१४ मध्ये ९८२६ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ९६६२ इतके पाणी नमुने शुद्ध आढळले त्याची टक्केवारी ९८.३३ इतकी आहे. १६४ अशुद्ध पाणी नमुने आढळले असून त्याची टक्केवारी १.६७ इतकी आहे.

बातम्या आणखी आहेत...