आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्थेअभावी शेतकऱ्यांची गैरसोय, मालालाही माफक भाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य शासनाने शेतकऱ्यांना आडतमुक्त केल्याविरोधात राज्यातील २९९ बाजार समित्यांतील आडतदार आणि व्यापाऱ्यांनी शनिवार(९ जुलै)पासून बेमुदत लिलाव बंदची हाक दिली आहे. कांदा, डाळिंब आणि भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये बंद असल्याने देशभरात या मालाचा पुरवठा होणार नाही, हे स्पष्ट झाले अाहे. विक्रीची पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला शनिवारी माफक भाव मिळला असला तरी त्यांचा भरपूर माल शिल्लक राहणार असल्याने त्यांनाही तोटा सहन करावा लागणार आहे. इतर राज्यांत भाजीपाला वितरणाची व्यवस्था नसल्याने पुरवठा ठप्प होणार असून, तेथील ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. लिलाव बंदचा बिगुल सर्वात प्रथम नाशिकमध्ये वाजल्याने जिल्ह्यातून मुंबई, बडोदा, सुरत, अहमदाबाद आणि नाशिकमध्ये जाणारा भाजीपाला, फळभाज्यांचा पुरवठा ठप्प होणार अाहे. किरकोळ विक्रीला मर्यादा असल्याने शेतकऱ्यांचा भरपूर माल तसाच पडून राहणार असल्याने त्यांचेही काही नुकसान होणार आहे. प्रशासनाने शेतकरी गटांच्या माध्यमातून ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पावसामुळे भाजीपाला कमी असल्याने तसेच पणन, सहकार आणि कृषी विभागाने शेतकरी गटांना सहकार्य केले नसल्याने शेतकऱ्यांचे गटही एकत्रित राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विल्हेवाट आणि ग्राहकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समितीच्या सभापतींसोबत चर्चा करून भाजीपाला पुरवठा करण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले अाहेत.

बंदमहाराष्ट्रात, फटका देशाला :गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, नेपाळ या ठिकाणी महाराष्ट्रातून सर्वाधिक भाजीपाला, कांदा, टोमॅटो, डाळिंबाचा पुरवठा होतो. आडतदार आणि व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला असल्याने भाजीपाला आणि फळभाज्यांच्या वितरणावर परिणाम होणार आहे. हा बंद लांबला तर भाजीपाल्याच्या दरात वाढ होणार आहे. नाशिक, पुणे, संगमनेर, वाशी येथील बाजार समित्यांमध्ये भाजीपाला, फळभाज्या आणि फळे खरेदी-विक्रीसाठी व्यापारी येतात. मात्र, शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आडतदार आणि व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने देशात पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे दोन दिवसांनंतर भाजीपाल्याच्या दरात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

समन्वयाच्या अभावाचा फटका : राज्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात थेट विक्री करता यावा, यासाठी शेतकरी गट तयार केले होते. सुरुवातीला या गटांनी भाजीपाला विक्रीस सुरुवात केली. मात्र, शहरामध्ये किरकोळ विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना दमदाटी करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी मिळाला. तसेच पणन, सहकार आणि कृषी विभागामध्ये समन्वय नसल्याचे एका कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शेतकरीआक्रमक : बाजारसमितीमध्ये व्यापाऱ्यांच्या गुंडांनी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मज्जाव केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत बाजार समितीमध्ये किरकोळ भाजीपाला विक्री करण्यासाठी हट्ट धरून त्याची विक्री केली. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

शेतकऱ्यांपुढे अडचणी : बंदमुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा किरकोळ भाजीपाला विक्रीसाठी संपूर्ण दिवस जाणार आहे. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होईल. तसेच, शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीसाठी कुठेही कायमस्वरूपी जागा नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

परवाने करा रद्द : आतापर्यंत शेतकऱ्यांच्या जिवावर मोठे झालेल्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. शासनाने अशा आडतदार आणि व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून नव्या बेरोजगार युवा शेतकऱ्यांना हे परवाने देण्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

कांदा करणार पुन्हा वांदा : देशामध्ये बंगळुरू, आग्रा, भुवनेश्वर, चेन्नई, दिल्ली, इंदूर, कळवण, कोलकाता, लासलगाव, मुंबई, पुणे आदी प्रमुख बाजारपेठांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. शुक्रवारी (८ जुलै)देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये लाख ६४ हजार २४७ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. त्यापैकी फक्त महाराष्ट्रातून ६० हजार ३९८ क्विंटल कांदा विक्री झाला होता. परंतु, शनिवारपासूनच्या बंदमुळे देशातील अन्य राज्यांना होणारा पुरवठा ठप्प होणार आहे. त्यामुळे कांद्याचा पुन्हा वांदा होण्याची शक्यता असल्याचे निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

बटाट्याच्या पुरवठ्यावर परिणाम : महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संगमनेर, नाशिक या बाजार समित्यांमध्ये बटाटा मोठ्या प्रमाणात विक्रीला येतो. मात्र, बंदमुळे बटाट्याच्या पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने बटाट्याची अधिक दरात विक्री होईल. मुंबईत १४ हजार ४४० क्विंटल, पुण्यात हजार ८८६, तर नाशिकमध्ये हजार ५०० क्विंटल प्रतिदिन बटाटा विक्रीला येतो.

विक्रीसाठी जागा द्यावी
पणन आणि कृषी विभागाने प्रत्येक शहरातील आरक्षित जागांवर शेतकरी गटांना शेतीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, शेतीमाल विक्रीसाठी मार्केटिंगची व्यवस्था करावी, अशा ठिकाणी शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी तयार आहेत. - योगेश रायते, शेतकरी
व्यापाऱ्यांवरबोजा
शिवार खरेदी करणे व्यापाऱ्यांना परवडणारे नाही. खर्च वाढणार आहे. परिणामी, ग्राहकांना शेतीमाल अधिक दराने खरेदी करावा लागणार आहे. शासनाने व्यापाऱ्यांवर टाकलेल्या आडतीच्या बोजामुळे त्याचे नुकसान होणार आहे. -संदीप पाटील, व्यापारी संचालक

कायमचे संपावर जावे
शासनानेआडतमुक्तीचाचांगला निर्णय घेतला आहे. पहिल्याच दिवशी शेतीमालाला चांगले वजन आणि चांगले दर मिळाले. तसेच, शेतकऱ्यांच्या कुबड्या काढून घेतल्याने खऱ्या अर्थाने त्यांना माहिती होणार आहे की, आपल्या शेतीमालाला अजून दर मिळाला पाहिजे. संपाच्या पहिल्या दिवसापासून शेतीमालाला दर मिळाल्याने आडतदार आणि व्यापाऱ्यांनी कायमचे संपावर जावे. -डॉ.गिरिधर पाटील, कृषी अभ्यासक

सुविधेची गरज
बाजारसमिती नियमनमुक्त करण्यापूर्वी शासनाने शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करण्याची गरज होती. मात्र, सुविधा देताच थेट निर्णय घेणे चुकीचे आहे. यामुळे शेतीमालाला कोणतीही सुरक्षा राहिली नाही. - देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक कृउबा

‘कृषी’तवर्ग करावे
शासनाच्या निर्णयामुळे बाजार समितीतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. शासनाने बाजार समितीच्या राज्यातील हजार कर्मचाऱ्यांना कृषी विभागात वर्ग करावे. -नीलेशदिंडे,विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र बाजार समिती कर्मचारी संघटना

अधिक दर देणाऱ्याला माल विकावा
शासनाच्या या निर्णयामुळे बाजार समितीबाहेर विक्री करणाऱ्या शेतीमालाला आणि पैशांना सुरक्षा राहणार नाही. त्यामुळे बाजार समितीत शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री केला तर त्यांच्याकडून आडत घ्यावी. तसेच, समितीबाहेर विक्री केला तर त्यांना आडतमुक्त करावे. त्यामुळे जो व्यापारी अधिक दर देईल त्यांना शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करावा. - सोहनशेठ भंडारी, अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन
बातम्या आणखी आहेत...