आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • North Maharashtra Region Found Very Rich In Minerals

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खनिज शोधण्याच्या छंदातून देशाला परकीय चलनाची प्राप्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील पांडवलेणी अन् पाथर्डी फाटा परिसरात एरव्ही पायाने उडवली जाणारी दगडे देशाला परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता ठेवत असतील यावर शक्यतो कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही स्वत:चे वेगळेपण जपणारी खनिजे या भागात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. याचे महत्त्व केवळ खासगी कंपन्यांनाच समजत असून, केंद्र शासनाच्या पातळीवर मात्र याबाबत उदासीनता असल्याचे चित्र पर्यावरण दिनानिमित्ताने जेलरोडच्या तरुणाच्या छंदामुळे समोर आले आहे.
जेलरोड परिसरातील वाणिज्य शाखेचा विद्यार्थी प्रतीक जोशी याने जपलेल्या छंदामुळे उत्तर महाराष्ट्र अन् नाशिकच्या भोवतालच्याही परिसरात मोठी खनिजे दडली असल्याच्या नोंदी त्याच्याजवळ उपलब्ध आहेत. गारगोटी संग्रहाच्या छंदातून त्याला खनिज अन् जीवाश्म जमवण्याच्या छंदाने झपाटले. या क्षेत्राची चांगली जाण असणार्‍या दीपक परदेशी यांनी त्याला योग्यवेळी मार्गदर्शन करून खनिजांची शास्त्रशुद्ध ओळख करून दिल्यानंतर विविध प्रकारची खनिजे जमवण्याचा त्याचा बनलेला छंदच त्याची आज नोकरी बनलाय. यामुळे निसर्गाच्या कुशीत दुर्लक्षितपणे पडून असलेली खनिजे अन् त्यांची माहितीही त्याच्याजवळ उपलब्ध आहे. एरव्ही भोवताली सापडणारे चमकदार दगड हे केवळ दगड नसून ती खनिजे असल्याच्या अज्ञानापोटी परकीय चलनापासून देश दूर राहत असल्याचे मतही खनिज अभ्यासक आणि संग्राहक प्रतीक जोशी याने व्यक्त केले. वाणिज्य शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतरही तो युरोपातील राष्ट्रांना खनिजांची निर्यात करणार्‍या सुशील सोनवणे यांच्या 'लार्जविंग्ज' या कंपनीत कार्यरत आहे.

भोवती आढळतात ही खनिजे : भोवताली आढळलेली खनिजे पुण्यात वाघोली परिसरात पेंटागोनाइट आणि कॅव्हनसाइट, नाशिकमधील सिन्नरनजीक मोहदरी घाटात आढळणारे ग्रीन अँफोफ्लाइट, नाशिकमधील पांडवलेणी परिसरात आढळणारे पॉव्हेलाइट ही खनिजे अत्यंत दुर्मीळ असल्याचा दावाही प्रतीक याने केला आहे. याशिवाय नाशिकमध्येच लाल रंगाचे फ्लोराइट हे खनिजही आढळते. जिल्ह्यातील येवला तालुक्यात स्पोलेसाइट, तर मालेगाव, दिंडोरी या तालुक्यांसहित जळगाव, धुळे या जिल्ह्यांत ग्रीन अँफोफ्लाइट आणि सुलेंडाइट ही खनिजे आढळत असल्याची माहिती प्रतीक याने दिली. खनिजांच्या शोधात असताना त्याच्या हाती काही दुर्मीळ जीवाश्मही लागले आहेत. जीवाश्मांच्या निर्यातीला परवानगी नसल्याने त्यांचे अभ्यासासाठी जतन करणार असल्याचे प्रतीक याने सांगितले.

आधुनिक तंत्रज्ञानाचा खनिजांना फायदाच
पूर्वी खनिज शोधल्यानंतर ते मिळवण्यासाठी तुलनेने सक्षम यंत्रणा नव्हती. आता मात्र ब्लास्टिंग, क्रशर आदी आधुनिक तंत्रामुळे ही खनिजे नुकसान न होता मिळू लागली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा हा फायदाच होत आहे.
हवे शासनाचे सहकार्य
भोवताली आढळणार्‍या खनिजांबाबत शासकीय स्तरावरून अनास्थाच आहे. परदेशात खनिजांसाठी भरणार्‍या प्रदर्शनांकरिता भारतातून लोकांना स्वखर्चाने यात सहभागी व्हावे लागते. ही खनिजेही स्वखर्चाने शोधावी लागतात. या प्रक्रियेत शासनाचा आधार मिळाल्यास देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत भरच पडेल. प्रतीक जोशी, खनिज अभ्यासक
निसर्गलेणे
नाशिक शहरासह जिल्ह्यातही मोठय़ा प्रमाणावर खनिजे; शासनाचे होतेय दुर्लक्ष