नाशिकराेड- महापालिकेच्या अभ्यासिकेतील समस्यांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या माेर्चाची दखल घेऊन प्रभाग सभापती केशव पाेरजे यांनी अभ्यासिकेची पाहणी केली. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ अभ्यासिकेत सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.
नाशिकराेड-देवळाली भूतपूर्व नगरपालिकेच्या कार्यकाळातील ३८ वर्षे जुनी असलेल्या अभ्यासिकेची दुर्दशा झाली अाहे. सहामाही फी भरूनदेखील विद्यार्थ्यांना सुविधा पुरवण्यात पालिका अपयशी ठरली अाहे.अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली अाहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शाैचालय तुंबलले, पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, विद्युत फिटिंग अपूर्ण असल्याने अभ्यासिकेत पुरेसा उजेड नाही, बसण्यासाठी खुर्च्या नाहीत, अशा असुविधांमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी विभागीय कार्यालयावर माेर्चा काढून अभ्यासिकेतील समस्यांचा पाढा वाचला हाेता.
शुक्रवारी सकाळी प्रभाग सभापतींनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत अभ्यासिकेचा पाहणी दाैरा केला. यावेळी त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींत तथ्य अाढळल्यानंतर त्यांनी बांधकाम, विद्युत विभाग, पाणीपुरवठा अाराेग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना अाठवडाभरात कामे पूर्ण करून अभ्यासिकेत सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले. प्रभाग सभापतींनी अवघ्या २४ तासांत तक्रारीची दखल घेतल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.