आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आयडीबीआयमध्ये मिळणार आधार कार्ड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आयडीबीआय बँकेमार्फत आधार कार्डची नोंदणी केली जाणार असल्यामुळे शासकीय योजनांच्या अनुदानासाठी बँक खात्याला आवश्यक असलेला आधारनंबरही तेथेच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना बँक खाते व आधारकार्ड नोंदणी एकाच ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

त्या सुविधेसाठी शासकीय मंजुरीही मिळाली असून, लवकरच बँकेमार्फत नोंदणी सुरू करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले. शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नंबर अनिवार्य असल्याने नोंदणीसाठी नागरिकांची धावपळ होत आहे. मात्र त्या प्रमाणात किट उपलब्ध नसल्याने आधारकार्ड नोंदणीसाठी केंद्रावर गर्दी होत असून, नागरिकांचे हालही होत आहे. त्यासाठी आधार नोंदणी संस्थांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.

सध्या जिल्ह्यात व शहरात सहा संस्थांच्या माध्यमातून आधार कार्डासाठी नोंदणी करण्यात येत आहे. त्यात ओम गुरुदेव या संस्थेची नव्याने वाढ होणार असून, त्याचा प्रस्ताव माहिती व तंत्रज्ञान सचिवांना पाठविण्यात आला आहे. त्यास त्वरित मान्यता देण्याची विनंतीही त्यांनी सोमवारच्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये केल्याचे जाधव यांनी सांगितले.

शहरासह जिल्ह्यात 45 लाख 59 हजार नोंदणी
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या आधार नोंदणीने आता वेग घेतला असून, शहरी भागासह जिल्ह्यात 45 लाख 59 हजार 29 नागरिकांची आधारकार्डची नोंदणी झाली आहे. जवळपास 50 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदणी झाली असून, ग्रामीण भागात 15 लाख 58 हजार 771 म्हणजे 46 टक्के आणि नगरपालिका व महापालिका अशा शहरी भागात 29 लाख 90 हजार 258 म्हणजे 49 टक्के आधारची नोंदणी झाली आहे.

डिसेंबरपर्यंत आधार नोंदणी पूर्ण होण्याची अपेक्षा
सध्या जिल्ह्यात 280 किट्समार्फत आधार कार्डची नोंदणी सुरू आहे. त्यात वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अनेकदा नोंदणी करताना बोटांचे ठसेच स्पष्ट येत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे. त्यासाठी संबंधित कंपन्यांना दज्रेदार नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील 100 टक्के आधारकार्ड नोंदणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसा आमचा प्रयत्नही आहे. नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी