नाशिक- महापालिका मुख्यालयाच्या विजेवर सहा महिन्यांत जवळपास २५ लाखांची उधळण हाेत असल्यावर ‘दिव्य मराठी’ने प्रकाश टाकल्यानंतर आता, काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी राजीव गांधी भवनाचे एनर्जी ऑडिट करण्यासाठी तयारी दाखवली आहे. त्यासाठी एक महाविद्यालय महापालिकेच्या संपर्कात असून, लवकरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे.
माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली होती. महापौरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानाचे सरासरी मासिक बिल १० हजारांपुढे होते. पालिकेत ८७ एअर कंडिशन थंडाईसाठी वापरले जात आहेत. ‘दिव्य मराठी’ने नुसतेच या थकबाकीकडे लक्ष वेधले नाही तर, पालिकेत शुक्रवारी सायंकाळी कार्यालय बंद झाल्यानंतरही सुरू असलेल्या विजेवरील उधळपट्टीचे छायाचित्र प्रसिद्ध करून निष्काळजीपणावर प्रकाश टाकला होता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याकडे एका महाविद्यालयाने एनर्जी ऑडिट करून घेण्यासाठी तयारी दर्शवली.
‘पालिकेतील लखलखाट’ हे वृत्त "दिव्य मराठी'ने शनिवारी प्रसिद्ध केले होते.