आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now More Police Security In Nashik City For People

दक्षता : नाशकात रस्त्या-रस्त्यावर गस्त, फोन करताच नागरिकांच्या सुरक्षेसाठी येणार पोलिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात वाढलेले गुन्हे रोखण्यासाठी नवीन पोलिस आयुक्तांसह पोलिस अधिकारी सक्रिय झाल्याचे वाढलेला पोलिस बंदोबस्त रस्त्यांवर सुरू असलेल्या पेट्रोलिंगद्वारे निदर्शनास येत आहे.
नियमित नाकेबंदीद्वारे गुन्हेगारांवर वचक निर्माण होणार नसल्याने यात काही परिणामकारक बदल पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहेत. त्यात साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून, लुटमारीचा प्रयत्न झाल्याची माहिती दिल्यास नागरिकांना पाच मिनिटांत पोलिसांची मदतही मिळणार आहे. नागरिकांनीही पोलिस दलात सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.
तत्कालीन पोलिस आयुक्तांच्या सुरुवातीच्या काळात गुन्हेगारांवर प्रचंड जरब निर्माण झाली होती. कालांतराने हा वचक कमी झाला. एस. जगन्नाथन यांनी पोलिस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शहरात तीन खून आणि दोन ठिकाणी लुटमारीच्या घटना घडल्या. या घटनांत सुमारे पंधरा लाखांची रक्कम लुटण्यात आली. प्राणघातक हल्ला, शस्त्र बाळगणे आदी गुन्हे घडू नयेत, यासाठी पोलिस आयुक्तांनी काही गोपनीय योजना सुरू केल्या आहेत.
शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी, कोम्बिंग ऑपरेशन, ऑलआउट या उपाययोजना नियमित प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. निर्जन रस्त्यांवरही पोलिस दिसत आहेत. शहरातील रस्त्यांवर सुमारे एक हजार साध्या वेशातील पोलिस नियुक्त केले आहेत. बाहेरील गुन्हेगारांकडून लुटमारीचे गुन्हे घडवले जात असल्याचे खुद्द पोलिस अधिकारी सांगतात. त्यानुसार, ग्रामीण शहर पोलिसांतर्फे नाकेबंदीचे नियोजन आहे. नागरिकांनी तोतया पोलिसांच्या क्लृप्त्यांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे.

अशी मि‌ळणार मदत : मदतीसाठी संपर्क केल्यास नियंत्रण कक्षासह स्थानिक पोलिस ठाणे, बीटमार्शल आणि बिनतारी संदेश यंत्रणेवर जोडले जातील.

पाच मिनिटांत मिळणार मदत : तोतया पोलिसांकडून लुटमारीच्या प्रयत्नाची माहिती नियंत्रण कक्षाला कळवल्यास काही वेळातच पोलिस येणार.

पोलिसांकडून जनजागृती : पोलिस दलाकडून परिसरात पत्रके वाटप करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून सूचना देण्यात येत आहे.

तोतया पोलिसांकडून दिशाभूल : आम्ही पोलिस आहोत, पुढे खून झाला आहे, दागिने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवा, असे सांगून दिशाभूल करत दागिने चोरी केले जातात तसेच त्यांच्याकडून फसवणूक केली जाते. या प्रकारांना महिला, वयोवृद्ध बळी पडतात.
मोबाइल अॅपद्वारे मिळेल मदत : सुरक्षेशी संबंधित विविध कंपन्यांच्या मोबाइल अॅपद्वारे शहरातील नागरिकांना तत्काळ मदत मिळणार आहे. तंत्रविश्लेषण शाखेकडून तत्काळ त्या ठिकाणांपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य होणार आहे.

नागरिकांनी सतर्क राहावे

शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. दागिने काढून ठेवण्यास कोणी प्रवृत्त करत असल्यास तत्काळ पोलिसांना कळवा. काही वेळात पोलिस मदतीला येतील. -एस. जगन्नाथन, पोलिस आयुक्त

पोलिस नियंत्रण कक्ष - २३०५२३३,२३०५२३४ आणि १०० नंबरवर संपर्क केल्यास नियंत्रण कक्षात पाच ठिकाणी हा नंबर जोडण्यात आला आहे. तर, महिलांच्या सुरक्षेबाबत ९७६२१००१००,९७६२२००२०० याक्रमांकांवर तत्काळ मदत उपलब्ध होईल.