आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पोस्टातही मिळणार सुविधा ‘एटीएम’ची!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पत्रव्यवहार, विविध अल्पबचत योजना अशा ठळक ओळखीसह टपाल खात्यात सध्या बदल होत आहेत. दळणवळणाच्या सुविधांचा झपाट्याने विस्तार आणि विकास होत असताना टपाल खात्याने गेल्या काही वर्षांत आपल्या प्राथमिक सुविधांमध्ये कालोचित सुधारणा करून नव्याचा ध्यास घेतला आहे.

प्रामुख्याने आर्थिक गुंतवणुकींसंदर्भात टपाल खात्याने विविध योजना सादर केल्या. परिणामी या खात्यातील सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहार वाढले असून, त्याची ओळख आता बँकांप्रमाणे होऊ पाहत आहे. आपल्या आर्थिक सुविधा अधिक गतिमान करण्यासाठी तसेच ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी टपाल खाते लवकरच बँकांप्रमाणे नाशिक, नाशिकरोड आणि इगतपुरी येथील कार्यालयांत ‘एटीएम’ची सुविधा सुरू करीत आहे.

शहरासह ग्रामीण भागातही टपाल खात्याचे जाळे खोलवर पसरले असताना खात्याच्या दरमहा, त्रैमासिक, वार्षिक बचत योजनांना पूर्वीपासूनच चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यातच विविध खासगी बँका, पतसंस्थांमधील घोटाळ्यांमुळे सामान्य गुंतवणूकदारांना या संस्थांची भीती वाटते. त्यामुळे विश्वासार्हता जपणार्‍या टपाल खात्याकडे वाढता कल असल्याचे दिसून येत आहे. सध्या बहुतेक सरकारी खात्यांमध्ये खासगी संस्थांप्रमाणे व्यावसायिकता रुजू पाहत असून, त्यामध्ये टपाल खातेही बरोबरीने विकास साधत असल्याचे दिसून येत आहे.

टपाल खाते देशभर ‘एटीएम’ सेवा सुरू करणार, अशी चर्चा काही महिन्यांपासून होती. त्याची आता लवकरच अंमलबजावणी होणार आहे. देशातील प्रमुख टपाल कार्यालयांत ‘एटीएम’ सुविधा सुरू करण्याचे काम नराडा या खासगी कंपनीला देण्यात आले असून, नाशिकमधील मुख्य टपाल कार्यालय, नाशिकरोड येथील विभागीय टपाल कार्यालय आणि इगतपुरी येथील कार्यालयातर्फे ‘एटीएम’ची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

इतर ठिकाणीही प्रारंभ
या सुविधेमुळे टपाल खात्याला फायदा होणारच आहे; मात्र नागरिकांची सोय होणार आहे. सध्या जिल्ह्यात तीन ठिकाणी ‘एटीएम’ सेवा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतर इतरत्रही तशा तयारीचे नियोजन केले जात आहे. पंकज कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी, टपाल खाते