आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रीपेड रिक्षाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर, जिल्हाधिकार्‍यांकडून हरकतींचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रवाशांची सुरक्षितता व रिक्षाचालकांकडून होणारी लूट लक्षात घेत अनेक वर्षांपासून ग्राहक संघटनांकडून होणार्‍या प्रीपेड रिक्षा सेवेच्या मागणीची दखल घेत परिवहन विभागाकडून एका सहकारी संस्थेला सेवेची परवानगी देण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत पारदर्शकपणा व तांत्रिक त्रुटी आढळल्याने जिल्हा प्रशासनाकडून तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे 11 एप्रिलचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

काही रिक्षाचालकांकडून होणार्‍या लूटमारीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ग्राहक संघटनांकडून वारंवार पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाकडे पुणे, मुंबईच्या धर्तीवर शहरातही प्रीपेड रिक्षा सेवेची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय सहकारी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश मोहिते यांनीही गेल्या दहा वर्षांपासून पोलिस आयुक्त, परिवहन अधिकारी व विभागीय आयुक्तांकडे नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून प्रवाशांना प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास परिवहन अधिकारी चंद्रकांत खरटमल व पोलिस उपआयुक्त नंदकुमार चौघुले यांच्याकडून चालना देण्यात आली.

पोलिस-परिवहन विभागाकडून तत्त्वत: प्रस्तावास मंजुरी देत येत्या 11 एप्रिलपासून नाशिकरोड येथून प्रायोगिक तत्त्वावर प्रीपेड सेवा सुरू करण्याचा मुहूर्त शोधण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावास कायद्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या परिवहन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक असते. यासाठी परिवहन अधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला असता अनेक तांत्रिक त्रुटी आढळून आल्या. त्यावर प्रशासनाने तातडीने आठवडाभरात इतर प्रवासी संघटना, रिक्षाचालक संघटना, नागरिकांच्या हरकती मागविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार 15 एप्रिलपर्यंत नागरिकांकडून हरकती मागवून 17 तारखेला हरकती विचारात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

अशी असेल सेवा

परिवहन विभागाकडून ठरवून देण्यात आलेल्या भाडेपत्रकावर प्रतिप्रवासी अवघे दोन रुपये जादा शुल्क आकारून सेवा देण्याचा संस्थेचा प्रस्ताव आहे. यासाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या आवारात बुकिंगसाठी कार्यालयाची जागादेखील उपलब्ध झाली आहे. या कार्यालयात संस्थेकडे नोंदणी झालेल्या 200 रिक्षाचालकांची नावे, परमीट व इतर संपूर्ण माहितीची कागदपत्रे राहणार असून, प्रवाशांना इंटरनेटद्वारे ऑनलाइन व दूरध्वनीद्वारे रिक्षा बुकिंग करण्यात येणार आहे. त्यावेळेत रेल्वेस्थानकावर प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होऊन त्यांच्या इच्छितस्थळी सोडणार आहे. यासाठी बुकिंग करतानाच प्रवाशाला रिक्षा क्रमांक, चालकाचे नाव व भाडे सांगितले जाणार आहे. तीन ते चार प्रवासी एकाच मार्गावर जाणार असल्यास त्यांना शेअररिक्षाची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

तब्बल 16 मार्ग
प्रीपेड रिक्षासेवेस मान्यता दिली असतानाच काही त्रुटी असल्यामुळे त्या दूर करण्यात येणार आहे. येत्या 17 तारखेला पुन्हा बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय होईल. त्यानुसार नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून नवीन बसस्थानक, महामार्ग व इतर 16 मार्गांवर प्रीपेड सेवा सुरू करण्यात येणार आहे. चंद्रकांत खरटमल,परिवहन समिती