आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वला मनसे, पश्चिमला भाजप; नाशिक मनपा प्रभाग सभापतिपदाची निवड चिठ्ठीद्वारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - पूर्व विभागामध्ये महायुती आणि विरोधी गटाचे मतदान प्रत्येकी 12 झाल्याने सभापतिपदाची निवड चिठ्ठीद्वारे करण्यात आली. त्यात मनसेच्या वंदना शेवाळेंची निवड झाली. आगामी विधानसभा निवडणूक पाहता खरे तर ही निवड आमदार वसंत गिते यांच्या पथ्यावर पडली. दुसरीकडे पंचवटीच्या बदल्यात पश्चिम प्रभाग भाजपला सोडण्यात आल्याने भाजपचे डॉ. राहुल आहेर सभापतिपदी विराजमान झाले.

महायुतीमुळे गतवर्षी महाआघाडीच्या रूपाने एकत्र आलेल्या विरोधकांच्या हाती (शिवसेना वगळता) या वेळी प्रभाग समिती आली नाही. यामुळे शिवसेनेने मनसेशी केलेल्या सलगीमुळे दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी आगपाखड केली. मंगळवारी पश्चिम आणि पूर्व प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीतही महायुतीचीच सरशी ठरली. त्यात पश्चिम विभागात मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षाचेच बलाबल अधिक असल्याने तेथे शिवसेनेची बिलकूल गरज पडली नाही. मनसे, भाजपने समझोता करीत पंचवटी आणि पश्चिम प्रभाग वाटून घेतले. यामुळे डॉ. राहुल आहेर हे अविरोध निवडले गेले. नाशिकरोड, सिडको, सातपूर आणि पंचवटी याबरोबरच पश्चिम अशा पाचही प्रभागाच्या निवडणुका महायुतीमुळे अविरोध झाल्या. पूर्व विभागात मनसे, भाजप आणि शिवसेना मिळून 12 सदस्य, तर विरोधकांतून दोन्ही कॉँग्रेसचे 9 आणि अपक्ष 3 असे 12 सदस्य समोरासमोर उभे ठाकले यामुळे सभापतिपद निवडण्याचा पेच निर्माण झाल्याने पीठासन अधिकारी विलास पाटील यांनी चिठ्ठीच्या पर्यायाचा आधार घेतला. त्यात वंदना शेवाळे यांचे नाव निघाल्याने तेथेही मनसेनेच बाजी मारली. अपक्ष नगरसेविका शेख रशिदा यांचा पराभव झाला. पश्चिम प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत मनसेच्या सुनीता मोटकरी, सुरेखा भोसले यांनी अर्ज माघारी घेतले.

प्रमुख समस्या सोडविणार
जुन्या नाशकातील अतिक्रमण, अस्वच्छता, पाणी या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार आहे. विकासकामे करताना भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. वंदना शेवाळे, सभापती, पूर्व प्रभाग

जबाबदारी पार पाडणार
पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प केला आहे. विभागातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्या सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. डॉ. राहुल आहेर, सभापती, पश्चिम प्रभाग