आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय-वासराची शुश्रूषा करून साजरा झाला अनोखा विकेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कमालीचीअस्वस्थ असलेली एक गाय अचानकपणे गंगापूरराेड येथील पंपिंग स्टेशन परिसरातील कश्यपी उद्यानात शिरली अाणि सैरभैर पळू लागली. याच अस्वस्थतेत ती उद्यानाच्या काेपऱ्यात उभी राहिली अाणि काही मिनिटांत तिने एका पांढऱ्या शुभ्र गाेंडस वासरास जन्म दिला.
या मुक्या जनावराच्या वेदना परिसरातील नागरिकांनी जाणल्या अाणि काही क्षणांत काेणी पाण्याने भरलेल्या बादल्या अाणल्या, तर काेणी धान्य. त्यानंतर सुरू झाला वासराच्या जन्माचा साेहळा. गेल्या दाेन दिवसांपासून या गाय वासराची शुश्रूषा करण्यात परिसरातील अाबालवृद्ध व्यस्त हाेते.

उच्चभ्रूंची वसाहत समजल्या जाणाऱ्या या परिसरात शनिवार रविवारच्या सुटीच्या दिवशी उद्यानात बऱ्यापैकी गर्दी असते. या उद्यानात शनिवारी दुपारी ही गाय दाखल झाली. तिची अस्वस्थता अाणि अाक्रमकता बघून उद्यानात असलेले सर्वच घाबरून बाहेर पडले. काही वेळात गायीने वासराला जन्म दिला. परंतु त्यानंतरही तिची अाक्रमकता कमी झाली नाही. वासराच्या बचावासाठी ती जिवाचे रान करीत हाेती. वासराला चाटून, पुसून स्वच्छ करेपर्यंत तिने काेणाला जवळपास फिरकूही दिले नाही. काही वेळानंतर ती पाणी प्याली, अाणि उपस्थितांच्या जिवात जीव अाला.

त्यानंतर कुणी तिला खाण्यासाठी धान्य अाणले, काेणी कणिक अाणून ठेवली, तर काेणी तयार चपात्या आणल्या. परिसरातील गृहिणींनी श्रद्धेने गाय-वासराचे अाैक्षण करून या नव्या पाहुण्याचे स्वागत केले. दाेन दिवस या अनाहूत पाहुण्याच्या स्वागताचा साेहळा सुरू हाेता. दरम्यान, वासरू दूध पीत नसल्याने काही प्राणिमित्रांशीही संपर्क साधण्यात अाला. मात्र त्यांनीही केवळ येण्याचे अाश्वासन दिले. प्रत्यक्षात दाेन दिवस काेणी अालेच नाही.

परिसरातील नागरिकांच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील प्रयत्न अखेर फळास येऊ लागले. पाहुणचार घेऊन स्थिरस्थावर झालेली गाय तुटलेल्या कंपाउंडमधून बाहेर अाली. तर उद्यानात अडकलेल्या तिच्या वासराला काहींनी उचलून बाहेर अाणले. काही क्षणांतच गायीने रस्ता धरला अाणि विसे मळा परिसरातील एका गाेठ्यात जाऊन ती वासरासह विसावली.
गाय-वासराच्या शुश्रूषेच्या माध्यमातून गोसेवा करण्यात आली. त्यातून यावेळी परिसरातील नागरिकांनी अनाेख्या पद्धतीने आपला विकेंड साजरा झाल्याचे समाधान सर्वांनी मानले. त्यांच्यासोबत गोळा झालेले कित्येक चिमुरडे मात्र वासराच्या रूपातला अापला लाडका मित्र त्यांच्या दूर निघून गेल्याने काही वेळ हिरमुसले. पण वासरूही त्याच्या आईसोबत गेल्याचे समाधान होते.

जखमी होऊनही सुरक्षारक्षकाने मोकळा केला पान्हा
परिसरातील सुरक्षारक्षक देवीदास सोनवणे यांनी गायीजवळ जाऊन वासरासाठी तिचे दूध काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अस्थिर असलेल्या गायीने त्यांना लाथा मारून दूर केले. त्यामुळे सोनवणे किरकोळ जखमी झाले. मात्र उपाशी वासराची काळजी वाटू लागल्याने त्यांनी तसेच प्रयत्न करून गायीचे घट्ट झालेले दूध काढून तिच्या लेकरासाठी पान्हा मोकळा करून दिला. असे एकेक क्षण नाजूक प्रसंगांनी भरलेले होते.

बातम्या आणखी आहेत...