आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Odd Mind Set Turn Into Owner Killing Proposition Increases

विकृत मनोवृत्तीमुळेच ‘ऑनर किलिंग’च्या प्रकारांत वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मागील आठवड्यात नाशिक व धुळे येथे दोन संतापजनक घटना घडल्या. त्यापैकी एक घटना म्हणजे आंतरजातीय विवाह करणा-या आपल्या गर्भवती मुलीचा बापानेच खून केला, तर दुसरी घटना म्हणजे अबला महिलांची कामे करून देण्यासाठी पैसे व शरीरसुखाची मागणी करणा-या लंपट तहसीलदारास जमावाने बदडले. या दोन्ही घटनांमुळे समाजातील विकृत मानसिकता समोर आली आहे. त्याची कारणे काय असू शकतात, याबाबत नाशिकचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. उमेश नागापूरकर यांनी अशा विकृत मानसिकतेवर टाकलेला प्रकाश त्यांच्याच शब्दांत.
सामान्य व्यक्तीकडून अशी विध्वंस्क कृती घडूच शकत नाहीत. मुळात आरोपी पिता हा मद्यपी असून कुठेही एकसारखे काम करत नसल्याने वैफल्यग्रस्तही आहे. मद्यपी व्यक्तींचे मनावर कधीच संतुलन नसते. त्यातच सभोवतालच्या व्यक्तींकडून वारंवार त्यास ‘तुझ्या मुलीने समाजाबाहेरील मुलासोबत लग्न केल्याने मोठे पापच केले’ असे टोमणे मारणे सुरू होते. यातूनच ‘ऑनर किलिंग’ची घटना घडली असू शकते. गुन्हेगारी मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता अशा घटनांमागे विकृतीच असते.


आंतरजातीय विवाह ही आता नवीन बाब राहिलेली नाही. प्रत्येकच समाजात असे विवाह होत असून त्यास कायदा व समाजानेही मान्यता दिली आहे. या खुनामागे आंतरजातीय विवाह हे तत्कालिक कारण नसून आरोपीने वर्षभरापूर्वीचा राग मनात ठेवून अतिशय नियोजनबद्ध हे कृत्य केले आहे. विचित्र विचार डोक्यात ठेवूनच तो घरादारात वावरत असेल. त्यातच खूप दिवसांनंतर मुलगी भेटली आणि त्यात ती गर्भवती असल्याचे कळले. त्यामुळे जणू तिने आपल्या नाकावर टिच्चून लग्नही केले या रागातून तिला शिक्षा केलीच पाहिजे अशी भावना आरोपीच्या डोक्यात आली असावी. अशा व्यक्तीला माया, प्रेम, आपुलकी कमी होऊन ती केवळ स्वत:चाच विचार करते. मी जे म्हणेल तेच खरे, ही प्रवृत्ती बळावत जाते. त्यातूनच आईचा मुलाकडून, मुलाचा बापाकडून तर बहिणाचा भावाकडून खून झाल्याची घटना घडते.


जबाबदारी समाजाची अन् कायद्याचीही
या घटनांवर अंकुश आणण्याची जबाबदारी जशी समाजाची आहे तशी ती कायद्याचीदेखील आहे. सद्य:स्थितीत कायद्याचा धाक उरलेला दिसत नाही. खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये तत्काळ आरोपीस कठोर शिक्षा झाल्यास त्याचा निश्चित समाजमनावर परिणाम होऊन असे कृत्य करणा-यांमध्ये धाक निर्माण होऊ शकतो. असे कृत्य करण्यापूर्वी किमान तो विचार करेल. आताच्या परिस्थितीत कितीही मोठा गुन्हा केला तरी आरोपी महिनाभरात जामिनावर बाहेर येतो. त्यामुळे काहीही केले तरी निश्चित सुटका होणारच असा विश्वास बळावत चालला असून हीच प्रवृत्ती घातक ठरते. कायद्यातील खटल्यांना लागणारा विलंबही अशा घटनांसाठी कारणीभूत ठरत आहे.


लंपट तहसीलदार राणेची विकृतीच
धुळ्यातील तहसीलदार ईश्वर राणे याची कृती ही केवळ कामभावनेचे विकृतीकरणच आहे. भरपूर पैसा, संपत्ती, सुखप्राप्ती झाल्यानंतरही काही व्यक्तींच्या गरजा वाढतच जातात. त्यात पैसा भरपूर असल्याने कोणावरही अधिकार गाजवण्यात आनंद मिळतो. त्यात शासकीय अधिकारी असल्याने कनिष्ठ कर्मचा-यांबद्दल मनात राग ठेवून त्यांना कमी लेखतात. त्यातच एखादी गरज पैशाविना भागत असेल आणि अशा पद्धतीने लैंगिक गरज एकदा पूर्ण झाल्यावर ती वारंवार करण्यास प्रवृत्त होतो. ही वृत्तीदेखील विकृतीच आहे. या विकृतीत आपण काय करतो, आपले वय, समाजातील प्रतिष्ठा याचे कुठलेही भान राहत नसल्याने घटना घडतात.