आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Of Businesses With Opportunities All About Technology

व्यवसायांच्या संधींसह- तंत्रज्ञानाचा बोलबाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-औद्योगिक उत्पादनांतील अत्याधुनिक नवतंत्रज्ञान आणि व्यवसायवृद्धीच्या असंख्य संधी यामुळे आयमा इंडेक्स प्रदर्शन गजबजले आहे. सहभागी उद्योजक व स्थानिक उद्योजकांतील समन्वय आणि एचएएलचे आउटसोर्सिंग रजिस्ट्रेशन यामुळे आगामी वर्षभरातील हजारो कोटींच्या उलाढाल प्रक्रियेला या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे.

अंबड इंडस्ट्रिज अँण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनतर्फे उंटवाडी परिसरातील ठक्कर्स डोम येथे ‘आयमा इंडेक्स-2014’ प्रदर्शन भरविण्यात आले असून, 212 स्टॉल्स असलेले हे प्रदर्शन 27 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सोलर, आयटी या उत्पादनांशी निगडित उद्योजक या प्रदर्शनात सहभागी झालेले आहेत. प्रदर्शनाला दोन दिवसांत 35 हजारांवर नागरिकांनी भेट दिली. हीच संख्या प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवसापर्यंत एक लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला. या प्रदर्शनात ‘बी टू बी’ संकल्पनेनुसार व्यवसायाचे आदान-प्रदान होत असल्याने स्थानिक उद्योजकांना त्याचा मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या वडगाव पिंगळा शिवारातील 140 एकरांवरील फूड पार्क प्रकल्पाचे सादरीकरणदेखील या प्रदर्शनात करण्यात आले. अन्न उद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग यांसारख्या शेकडो उद्योगांकरिता येथे जागा, सुविधा व उद्योजकांकरिता शासकीय अनुदान उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष अनिल जैन म्हणाले.
स्थानिकांना व्यवसायसंधी
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून इंडिनायजेशन संकल्पनेतून हजारो कोटींचा व्यवसाय भारतात आणला गेला आहे. नाशिकचा विचार करता स्थानिक उद्योजकांकडून एकूण मागणीच्या 15 टक्केच उत्पादन उपलब्ध होत आहे. हे प्रमाण वाढविण्याची संधी उद्योजकांना आहे. त्यासाठी व्हेंडर रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबवित असल्याचे प्रतिपादन इंडिनायजेशनच्या उपमहाव्यवस्थापक पूनम र्शीवास्तव यांनी केले. ‘आउटसोर्सिंग आणि संधी’ या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. एचएएलचे उपमहाव्यवस्थापक एन. बी. सहारे, अतिरिक्त महाव्यवस्थापक नारायणन व व्यवसाय विभागाचे विभागीय महाव्यवस्थापक जीएसआर प्रसाद उपस्थित होते. आयमाचे उपाध्यक्ष विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले.