आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीला रंग ‘ऑफर्स’चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- डॉलरच्या तुलनेत होत असलेले रुपयाचे अवमूल्यन व जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीमुळे जगभरातील उद्योग प्रभावित झालेले असतानाही ग्राहक नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत खरेदी करत असल्याने बाजाराला उजाळा लाभला आहे. त्यातही गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठीचा उत्साह मोठा आहे. मंदीमुळे टीव्ही, एलसीडी, फ्रिज व वॉशिंग मशिन्सच्या किंमती पाच ते दहा टक्के वाढलेल्या असल्या तरी त्यांच्या खरेदीला कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक ऑफर्सचा बूस्टर डोस लाभतो आहे.

जागतिक बाजारपेठेत रुपयाच्या अवमूल्यनामुळे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलसीडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, म्युझिक सिस्टिम्स यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत ही वाढ पाच ते दहा टक्क्यांपर्यंत झाल्याने उत्पादने महागली आहेत. आयातमूल्यातील वाढीमुळे कच्च्या मालाच्या किंमती आणि वाहतूकदरात वाढ होऊन त्याचा बोजा उत्पादनमूल्यावर पडला आहे. त्यामुळे दरहजारी किमान शंभर रुपये ग्राहकांना जास्त मोजावे लागत आहेत. मात्र, तरीदेखील नवरात्र, दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर होम अप्लायन्सेसची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका या वस्तूंना चालना देण्यासाठी स्वस्त व्याजदराने कर्जपुरवठा करत आहेत.

वित्तसहाय्य करणार्‍या कंपन्यांच्या ऑफर्स
नवरात्र, दसरा, दीपावलीच्या काळात होम अप्लायन्सेसची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असते. म्हणूनच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील बॅँका रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एलसीडी, दुचाकी वाहन या वस्तूंना चालना देण्यासाठी स्वस्त व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहेत. या क्षेत्रांना चालना देऊन मागणी वाढविण्यासाठी केंद्र सरकारने बॅँकांना वाढीव भांडवल पुरविण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. काही वित्तीय कंपन्यांनी शून्य टक्के व्याजदराने व कमीत कमी डाऊनपेमेंटवर उत्पादने खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याने खरेदी सुलभ झाल्याचे चित्र आहे.