आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० लाखाची लाच: अपर जिल्हाधिकारी अटकेत, मालेगावात फोन रेकॉर्डिंगच्या आधारे कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जमीन व्यवहार प्रकरणात फौजदारी कारवाईची नोटीस पाठवत ती टाळण्यासाठी तक्रारदाराकडे ५० लाखांची मागणी केल्याबद्दल मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव पवार यांच्यासह दिनेशभाई लालजीभाई पंचासरा या ठेकेदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. गुरुवारी सकाळी ११ वाजता मालेगाव कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. रक्कम स्वीकारली नसली तरी फक्त पैसे मागितल्याचे फोन कॉल रेकॉर्ड करून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदारांनी गणेशनगर व गंगाधरी (ता. नांदगाव) शिवारात ७५ एकर ८५ गुंठे शेती विकत घेतली. याची नोंद नांदगाव उपनिबंधकांच्या कार्यालयात करून हस्तांतरण शुल्काची रक्कम शासनाकडे जमा केल्याचे प्रतिज्ञापत्र दस्तासोबत जोडले. या व्यवहाराबाबत पवार यांनी अाक्षेप घेतला. तक्रारदार हे शेतकरी नसून खरेदी केलेली शेतजमीन शासनाच्या मालकीची व पट्टेदाराच्या ताब्यातील आहे. या हस्तांतरणाकरिता विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीने हस्तांतर शुल्क शासन जमा केलेले नाही. त्यामुळे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम तरतुदींचा भंग होत असल्याने फौजदारी कारवाईची नोटीस पवार यांनी तक्रारदारांना दिली. ही कारवाई टाळण्याची विनंती तक्रारदारांनी पवार यांना केली होती. त्यासाठी २७ मे रोजी मध्यस्थ दिनेशभाई पंचासरा यांची भेट घेतली. त्यांनी कारवाई थांबवण्यासाठी ५० लाखांची मागणी केली.

दरम्यान तक्रारदार, पवार आणि पंचासरा यांच्यात दूरध्वनीवर चर्चेत झालेल्या तडजोडीत ३५ लाख देण्याचे ठरले. याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. हे माहित होताच पवार व पंचासरा यांनी रक्कम घेण्यास टाळाटाळ केली. मात्र, तिघांच्या फोन रेकॉर्डिंगच्या आधारे लाच मागितल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे शासकीय पंचांची साक्ष आणि कायदेशीर बाबी तपासून पवार आणि पंचासरा यांच्याविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या मालेगावातील घर व कार्यालयाची झडती घेण्यात आली.

निवृत्तीस ८ महिने बाकी
पवार यांना सेवानिवृत्तीस अवघे आठ महिने शिल्लक असताना लाचप्रकरणी कारवाईत अडकले. नाशिक येथे धान्य पुरवठा अधिकारी असतानाही त्यांनी अनेक नियमबाह्य कामे केली. अपर जिल्हाधिकारी असल्याने नजराण्याच्या जमीन खरेदी-विक्रीमध्ये अनेक प्रकरणांत त्यांनी मध्यस्थांच्या मार्फत नियमबाह्य परवानग्या दिल्याची चर्चा आहे.
बातम्या आणखी आहेत...