आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शताब्दी गाठणारे वीज मीटर होणार निवृत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - विजेच्या वापराचे वाचन (रीडिंग) करणारे व सुमारे 116 वर्षांपासून जगात वापरात असलेले इलेक्ट्रोमॅकॅनिकल (चकती) मीटर इतिहासजमा होत आहे. नाशिक जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांचे आजपावेतो पाऊण लाख इलेक्ट्रोमॅकॅनिकल मीटर्स बदलविण्यात आले असून, नवीन जोडणी घेणार्‍या 42 हजार ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर्स लावले आहेत.एप्रिल 2012 पासून महावितरण कंपनीची इलेक्ट्रोमॅकॅनिकल मीटर कार्यरत असलेल्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि इन्फ्रारेड मीटर्स लावण्याची मोहीम हाती घेतलेली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मीटर
इलेक्ट्रोमॅकॅनिकल मीटर प्राथमिक अवस्थेतील असून, दुसर्‍या टप्प्यात सद्यस्थितीत वापरामध्ये असलेल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा स्टॅटिक मीटरमुळे पूर्वीपेक्षा युनिट वाचनात (रीडिंग) अधिक अचूकता आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किट व डिजिटल डिस्प्लेसह रीडिंगसोबतच करंट, व्होल्टेज, पॉवर, अर्थ लिकेज, राँग कनेक्शनची स्वतंत्रपणे माहिती मिळते. रीडिंग संगणकीय, एमआरआय (मीटर रीडिंग इन्स्ट्रमेंट) पद्धतीने घेता येते. मॅकॅनिकल पार्ट नसून, सुमारे 10 ते 15 वर्षे आयुष्य आहे. रीडिंग चुकीची शक्यता 0.2 ते 1 टक्के आहे. सद्यस्थितीत बहुतांश मीटर्स याच पद्धतीचे आहेत. महावितरणकडून फोटो मीटर रीडिंग पद्धतीने या इलेक्ट्रॉनिक्स मीटरचे देयके देण्यात येतात. प्रत्यक्ष मीटरचा फोटो घेणे, रीडिंग नोंदविणे, पंचिंग करून वीज देयके तयार करणे, अशी प्रक्रिया आहे.

1884मधील शोध
इलेक्ट्रोमॅकॅनिकल वीज मीटरचा शोध फेरारीस यांनी सन 1884 मध्ये लावला. त्यामुळे या मीटरला फेरारीस म्हटले जाते. राज्यात चकतीचे मीटर म्हणून ते ओळखले जाते. चुंबकाच्या आधारे मॅकॅनिकल पद्धतीने वीज वापराचे यात वाचन होते. व्होल्टेज व करंटसाठी दोन चुंबक व तांब्याच्या कॉइलच्या मध्ये अँल्युमिनिअमची डिस्क व्होल्टेज व लोडनुसार फिरल्याने युनिटचे मापन होते. रीडिंगमधील चुकीची शक्यता दोन टक्के आहे. पूर्णत: यांत्रिक पद्धतीच्या मीटरचे आयुष्य 15 ते 20 वर्षे असून, मॅग्नेटची कमी होत जाणारी शक्ती, वातावरणातील बदल, सतत फिरणार्‍या उपकरणांची झीज यामुळे कालांतराने गती मंद होते.

अत्याधुनिक मीटर
आता तिसर्‍या टप्प्यातील अत्याधुनिक व स्वयंचलित पद्धतीने रीडिंग घेता येणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) व इन्फ्रारेड (आयआर) मीटर बसविण्यास शहर-ग्रामीणमध्ये वेग आला आहे. दोन्ही प्रकारचे एक लाख 48 हजार 59 मीटर्स बसविण्यात आले आहे. राज्यात हे मीटर्स बसविण्याची मोहीम सुरू आहे. नाशिक शहरात इन्फ्रारेड (आयआर) नवीन जोडणी ग्राहकांना 11,564, तर 17,293 ठिकाणी मीटर बदलवण्यात आले. ग्रामीण मध्ये 30,490 नवीन ठिकाणी तर 58,406 ठिकाणी बदलवण्यात आले. जिल्ह्यात शहरी 4 लाख 47 हजार 981, तर ग्रामीण 4 लाख 58 हजार 111 ग्राहक आहेत.

लवकरच बदल
मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. कधी पूर्ण होईल सांगता येणार नाही. मीटर्स उपलब्धतेनुसार बदलवले जातात. येत्या काही महिन्यांत सर्वत्र इलेक्ट्रॉनिक्स कार्यरत होऊन इलेक्ट्रोमॅकॅनिकल मीटर्स इतिहासजमा होईल. के. व्ही. अजनाळकर, मुख्य अभियंता