आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकात होणार 10 लाख लिटरचा जलकुंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुने नाशिक परिसरातील महत्त्वाचा भाग असलेल्या मोठा राजवाडा व बागवानपुरा या परिसरातील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशी विविध मूलभूत कामे मार्गी लावण्यात आल्याची माहिती संजय साबळे यांनी दिली. मोठा राजवाडा तसेच कथडा भाग, तेजाळे चौक या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी या वेळी संतप्त महिलांनी केल्या. या तक्रारींची दखल घेत नगरसेवक संजय साबळे व शबाना पठाण यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी लवकरच नवीन जलकुंभ उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, महापालिकेकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना दिले.

मोठा राजवाडा येथील काळे चौकात ‘दिव्य मराठी’च्या वतीने रविवारी ‘विकास मंच’ अभियान पार पडले. या वेळी प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक संजय साबळे, शबाना पठाण यांनी नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी हाजी बबलू पठाण, महापालिकेच्या पूर्व विभाग कार्यालयातील बांधकाम विभागाचे अधिकारी रवींद्र धारणकर, पाणीपुरवठ्याचे नाना वाडिले, राजेंद्र जाधव, वैद्यकीय विभागाचे डॉ. एन. भोये, उद्यान विभागाचे आर. ए. गायकवाड आणि कर्तव्य संस्थेचे मनोज जांगडा आदी मान्यवर उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’चे वृत्तसंपादक प्रताप जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. ‘विकास मंच’ अभियानात प्रभागातील नागरिकांसह महिला, युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. पाणीपुरवठा अधिकारी नाना वाडिले यांनी सांगितले की, कथडा चौक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगतच्या जागेवर सुमारे 10 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार असून, त्यासाठी साधारण 80 ते 90 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. जलकुंभ व जलवाहिन्यांचे काम पूर्णत्वास गेल्यानंतर या भागातील पाणीप्रश्न सुटू शकेल, असेही त्यांनी सांगितले. अंतर्गत रस्ते, पथदीप, उद्यान, जलवाहिनी अशी विविध कामे प्रस्तावित असून, ती पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा होईल. ‘विकास मंच’ या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांनी समस्या व प्रश्नांची विचारणा करीत आपली गाºहाणी मांडली.

पूर्ण झालेली विकासकामे
० कथडा मदरसा परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण- 25 लाख 97 हजार रुपये
० राजवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविणे- 11 लाख 31 हजार रुपये
० महापालिकेची 54 क्वार्टर वसाहतीची दुरुस्ती- 20 लाख 49 हजार रुपये
० प्रभागातील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण- 12 लाख रुपये