आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी मिळाल्यास राजकारणातूनही सेवा करू, प्रसिद्ध नेमबाज गगन नारंग याने दिले राजकारणात उतरण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सध्या मी नेमबाजाच्या भूमिकेत असून येत्या ऑलिम्पिकमध्ये 'सबसे चमकीला' (अर्थातच सुवर्ण ) पदक मिळवणे हेच ध्येय ठेवलेले आहे. मात्र, यदाकदाचित विचारणा झाली आणि राजकारणाच्या माध्यमातूनही देशाची सेवा करण्याची संधी मिळाली तर त्या माध्यमातूनही देशसेवा करेन...
प्रख्यात नेमबाज आणि लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता गगन नारंग याने रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी ऑलिम्पियन रौप्यपदकविजेता नेमबाज राज्यवर्धन राठोड यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली आहे. सध्या त्यांच्याकडे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्रिपदाची धुरा आहे, त्यातून ते सेवा बजावत आहेत. तसेच मलादेखील भविष्यात वेगळ्या माध्यमातून चांगल्या प्रकारे देशसेवेची संधी मिळाली तर ती सोडणार नाही, असेही नारंग यांनी नमूद केले.

उमेदीतच पुरस्कार मिळावेत
प्रत्येक खेळाडूला पुरस्कार मिळावा असे वाटणे साहजिक आहे. अर्थात कुणी काहीही मागितले तरी कुणाला पुरस्कार प्रथम द्यायचा आणि कुणाला नंतर द्यायचा याचा निर्णय केंद्र सरकारनेच घ्यायचा असतो. मात्र, कोणत्याही खेळाडूला मिळणारा पुरस्कार हा त्याच्या उमेदीच्या काळातच मिळायला हवा. तो पुरस्कार उमेदीच्या काळात मिळाला तरच प्रोत्साहन मिळून तो खेळाडू अधिक विश्वासाने पुढील लक्ष्य गाठू शकतो, असेही गगन नारंगने नमूद केले.

आईवडिलांनी बंदुकीसाठी घर विकले
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी नारंग यांनी त्यांच्या बालपणाचे वास्तव चित्र उलगडून दाखवले. मी बालपणी सगळे खेळ खेळायचो, पण नेमबाजी अधिक आवडायला लागली होती. त्या वेळी मी आईवडिलांना सांगितले की मला या खेळातच करिअर करायचे आहे. परंतु त्या वेळी तो खेळ अधिकच महागडा असल्याने माझे पालक चिंतेत पडले. ते शासकीय नोकरीत असल्याने परिस्थिती मध्यमवर्गीयच होती. मात्र, थोड्याच दिवसांनी मला जर्मन बनावटीची अत्याधुनिक बंदूक त्यांनी मला सरावासाठी दिली. त्यानंतर वर्षभराने मला समजले की त्या बंदुकीसाठी माझ्या पालकांनी आमचे राहते घर विकले होते. त्यानंतर पंधरा वर्षे आम्ही भाड्याच्याच घरात राहत होतो. त्यामुळे आज मी ज्या उंचीवर पोहोचलोय त्याला केवळ माझ्या पालकांचा त्याग आणि दूरदृष्टीच कारणीभूत असल्याचे नारंग यांनी नमूद केले.