आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉन बॉस्को मार्गावर विद्यार्थी, महिला दहशतीखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कॉलेज रोड गंगापूररोडला जोडणाऱ्या डॉन बॉस्को मार्गावर रोजच होणारा समाजकंटकांच्या उपद्रवाचा मुद्दा अल्पवयीन मुलाच्या दुर्दैवी खुनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. परिसरात शाळा, महाविद्यालये, मुलींचे वसतिगृह, तसेच उच्च मध्यमवर्गीयांची वसाहत असूनही पोलिस गस्त नसल्याने टवाळखोर गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले आहे. खून, दरोडे, लूटमार यांसारख्या घटनांनी नागरिक हैराण झाले असतानाही पोलिस यंत्रणेला जाग येत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
रात्रीच्या वेळी अतिशय सुनसान असणाऱ्या डॉन बॉस्को मार्गावर रस्त्याच्या कडेलाच मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एच.पी.टी. कॉलेज मार्गावर दिवसभर टवाळखोरांचा, तर रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांचा त्रास नित्याचाच झाला आहे. शाळा महाविद्यालयीन वेळेत धूम स्टाइल कर्णकर्कश हॉर्न वाजवित चालणाऱ्या रायडर्सचा विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करत जीव मुठीत धरूनच वावरावे लागते. या वेळेत वाहतूक पोलिसांच्या स्वतंत्र पथकाची गरज आहे. मात्र, या ठिकाणी एकाही पोलिसाची नियुक्ती केलेली नाही. रात्री हा मार्ग सुनसान असल्याने पथदीपही बंद असल्याने गुंडांचे फावते. अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेलाच मद्यप्राशन सुरू असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी डॉन बॉस्काे मार्गाने जाण्याची हिंमत महिला-मुले करत नाहीत. पोलिसांनी रात्री गस्तीत वाढ करावी, अशी मागणी हाेत आहे.
..तरीही पोलिस थंड : पोलिस आयुक्तपदात खांदेपालट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गुन्हेगारांनी खुनाने सलामी दिली होती. सातपूर पोलिसांच्या हद्दीत एकाच महिन्यात तीन खुनाच्या घटना घडल्या. त्यापाठोपाठ सिडको, पंचवटी, नाशिकरोड, समतानगर या भागातही खून झाले. तरीही पोलिसांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.
...टवाळखोर निर्धास्त
यामार्गावर प्रमुख इंग्रजी शाळा, महाविद्यालये, विद्यार्थिनींची वसतिगृहे, ख्रिश्चन धर्मगुरूंचे प्रशिक्षण केंद्र निवासस्थाने अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे असतानाही केवळ पोलिस यंत्रणेचा वचक नसल्याने टवाळखोर निर्धास्त झाले आहेत.
बातम्या आणखी आहेत...