आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Presentation Of City Bus Structure In Front Of General Meeting In Nashik

महापालिका बससेवेचे आज सादरीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात महापालिकेने नेमलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी’मार्फत मंगळवारी (दि. 15) महापालिकेच्या बससेवेचे सादरीकरण केले जाणार आहे. महासभेने दोन वेळा फेटाळलेला हा विषय पुन्हा येत्या महासभेसमोर सादर केला जाणार आहे. दरम्यान, पालिकेचे आर्थिक नुकसान करून खासगीकरणाद्वारे बससेवेचा घाट घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी केला आहे.

सन 2007 मध्ये राज्य परिवहन विभागाच्या आयुक्तांनी महापालिकेमार्फत बससेवा चालविण्याबाबतचा सादर केलेला प्रस्ताव विभागीय नियंत्रकांनी पालिकेला 25 फेब्रुवारी 2008 रोजी सादर केला होता. त्यासंदर्भात 25 ऑगस्ट 2008 रोजी विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार 10 सप्टेंबर 2009 रोजी महासभेसमोर प्रस्ताव सादर केला. मात्र, सदस्यांनी प्रस्ताव तहकुबीची सूचना केली. यानंतर पालिका आयुक्तांनी पुन्हा महासभेवर हा विषय सादर केला. त्यावरील ठरावानुसार बससेवा पालिकेने किंवा राज्य परिवहनने चालवावी, असे पर्याय देण्यात आले होते. पालिका सेवा देण्यास तयार नसेल तर राज्य परिवहन विभागाला ना हरकत पत्र द्यावे, असेही त्यात नमूद केले होते. आतापर्यंत दोन वेळा फेटाळलेला विषय पुन्हा महासभेवर सादर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.

विरोधी पक्षनेता बडगुजर यांनी नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत मिळणार्‍या 400 कोटींसाठी पालिकेला आर्थिक खाईत ढकलण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप करत बससेवा हाती घेतल्यास वर्षाला पालिकेस किमान 100 कोटींचा फटका बसू शकतो, असा दावाही त्यांनी केला.

परिवहन विभागावर दृष्टिक्षेप
रोज 43 हजार 648 कि.मी. शहरातून प्रवास
रोज 3,500 हजार होतात फेर्‍या
40 हजार पासद्वारा प्रतिमाह 80 लाख उत्पन्न
1 कोटी 60 लाख रुपये शासनाकडून निधी
महिन्याला 1 कोटी 4 लाख 90 हजार तोटा
महिन्याला डिझेलवर 2 कोटी 14 लाख खर्च
कर्मचार्‍यांसाठी 2 कोटी 25 लाखांचा खर्च
महापालिका हद्दीत 190 एकूण बसेस
एकूण 1207 चालक, वाहक व कर्मचारी.
महिलांसाठी 12, विद्यार्थ्यांसाठी दररोज 75 फेर्‍या मारल्या जातात.


उत्पन्न 35, खर्च 43 रुपये
सध्या बससेवेत मोठा तोटा होत असून, प्रतिकिलोमीटरसाठी 43 रुपये खर्च आणि त्या बदल्यात उत्पन्न मात्र 35 रुपये मिळते.1 एप्रिल 2013 ते सप्टेंबर 2013 या सहा महिन्यांत या 9 कोटी 38 लाख रुपयांचा तोटा झाल्याचे बडगुजर यांनी सांगितले. सप्टेंबर 2013 मध्ये 5 कोटी 63 लाख 20 हजार खर्च, तर 4 कोटी 58 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.


तांत्रिकदृष्ट्या सेवा अशक्य
एसटी महामंडळाकडून शहर बससेवा चालवली जात असून, मागणी केल्यास तत्काळ महापालिकेस ती सुपूर्द करू. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य नाही. बससेवा चालविण्यासाठी मोठी यंत्रणा आवश्यक आहे. तसेच, यापूर्वीच पालिकेने ना हरकत दाखला दिलेला आहे. कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक