आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Again Water Cutting In Nashik Municipal Corporation

पाणीकपातीच्या पुन्हा पालिकेत हालचाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस गतवर्षाच्या तुलनेत गंगापूरसह गौतमी काश्यपी धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याची बाब हेरून आता महापालिकेत पुन्हा पाणीकपातीच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, जलसंपदा खात्याकडूनही पालिकेला पाणीकपातीबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे स्मरणपत्र पाठवले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासन महापौरांशी चर्चा करून नेमकी कधी पाणीकपात जाहीर करते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महापालिका क्षेत्रातील गंगापूर, गौतमी-गोदावरी, काश्यपी तसेच काही प्रमाणात दारणा धरणातून पाणी मिळते. साधारण गेल्या वर्षी ४५०० दशलक्ष घनफूट इतके पाणी पालिकेसाठी आरक्षित होते. यंदा पालिकेने ४६०० दशलक्ष घनफुटांपर्यंत पाण्याची मागणी नोंदवली आहे. पाणी आरक्षणाचा कालावधी १५ ऑक्टोबर ते १५ जुलै इतका असून, सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धरणावर पाण्याचे कोणतेही आरक्षण नाही. मात्र, पालिकेचा शिल्लक पाणीसाठा अद्यापही असल्यामुळे मागणीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. मध्यंतरी स्थायी समितीने बैठक घेऊन शहरात २० सप्टेंबरपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, निर्णय झाल्यानंतर दोन दिवसांत शहरात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत साधारण १० ते १२ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे महापौरांनी बैठक घेऊन सप्टेंबरअखेरपर्यंत पावसाची स्थिती बघून पाणीकपातीबाबत फेरनिर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा पाणीकपातीबाबत विचार सुरू झाला आहे. राज्याच्या जलसंपदा खात्यानेही याबाबत महापालिकेला स्मरणपत्र पाठवण्याचा निर्णय घेतला असून, शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याबाबत पालिकेवर दबाव येणे स्वाभाविकच झाले आहे. पावसाने दिलेली ओढ बघता काटकसरीने पाणी वापरण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तरच लागेल उधळपट्टीला चाप
ज्या दिवशी महापालिका शहराच्या विशिष्ट भागात पाणी येणार नसल्याचे जाहीर करते, त्यावेळी संबंधित भागातील लोक पाण्याचा जपून वापर करतात, असे चित्र नेहमीच पाहायला मिळते. सद्यस्थितीत गंगापूर धरणात ७०, तर छोट्या धरणात ५० टक्क्यांपर्यंत पाणी आहे. गेल्यावेळी याच कालावधीत साधारण ९० टक्क्यांपर्यंत पाणी होते. त्यामुळे पावसाने अशीच ओढ दिल्यास भविष्यकाळात पाण्याचे संकट गडद होऊ शकते ही मानसिक तयारी लोकांची होऊ शकते, यादृष्टीने पाणीकपात गरजेची असल्याचे मत महापालिका प्रशासनातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. शहरात पाणीकपात केल्यास किमान वाहने, बांधकाम वा अन्य कामांसाठी बेसुमार पाण्याचा वापरही थांबू शकेल वा त्यावर निर्बंध येतील, असाही युक्तिवाद केला जात आहे.

आयुक्तांबरोबर आज बैठकीची शक्यता
महापालिकेच्यापाणीपुरवठा विभागाकडून बुधवारी (दि. ३०) आयुक्तांकडे यासंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महापौरांशी चर्चा करून शहरात पाणीकपात करण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.