आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित कॉलनीत होणार दीड कोटींचा जलकुंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूररोड परिसरातील पंडित कॉलनी, उत्कर्ष कॉलनीसह प्रभाग क्रमांक १४ मधील अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत दहा दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे सादर केल्याची मािहती नगरसेवक अजय बोरस्ते नगरसेविका तथा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी ‘दिव्य मराठी’ विकास मंच अभियानात दिली. या जलकुंभासाठी दीड कोटीहून अधिक खर्च प्रस्तावित असून, हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत प्रमोद महाजन उद्यानात ग्रीन जिम उभारण्यात येणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
पंडित कॉलनी भागातील मुरकुटे कॉलनीतील सभागृहात ‘दिव्य मराठी’तर्फे रविवारी विकास मंच अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविक तथा अामदार प्रा. देवयानी फरांदे नगरसेवक अजय बोरस्ते यांनी नागरिकांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रसंगी माजी उपमहापौर मनीष बस्ते उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’चे वृत्त संपादक प्रताप जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विकास मंचमध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह युवक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली गाऱ्हाणी मांडली, तसेच महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.
गंगापूररोड परिसरातील प्रभाग १४ मध्ये विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाईच्या समस्यांच्या तक्रारींचा पाढा नागरिकांनी वाचल्यानंतर त्याची दखल पंडित कॉलनीतील लायन्स क्लब उद्यानालगत १० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येणार असून, त्यासाठी प्रस्तावही तयार करण्यात आला आहे. या जलकुंभामुळे प्रभागातील पाणीप्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याची माहिती नगरसेवक बोरस्ते यांनी दिली. प्रमोद महाजन उद्यानाच्या डागडुजीसह आकर्षक रंगरंगोटी, पथदीप व्यवस्था आणि ग्रीन जिम उभारण्यात येणार असून, त्यासाठी ११ लाख रुपये खर्चही प्रस्तावित असल्याची माहिती प्रा. फरांदे यांनी दिली. प्रभागातील बंद पथदीपांमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, महिला ज्येष्ठांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी बंद पथदीप सुरू करण्यात येतील, असेही या वेळी सांगण्यात आले.
अनधिकृत अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आयुक्तांशी चर्चा करून अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. प्रभागातील सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतील. प्रभागातील बहुतांश कामे पूर्ण झाली असली, तरी उर्वरित कामे प्रस्तावित असून, पुढील दोन वर्षांत ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ‘विकास मंच’ या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांनी समस्या प्रश्नांची विचारणा करीत आपली गाऱ्हाणी मांडली.
क्रीडासंकुल उभारणार, वाहनतळासाठी प्रयत्न : मुरकुटे संकुल परिसरात ५० लाख रुपये खर्च करून क्रीडा संकुल अन् व्यायामशाळा उभारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इनडोअर आउटडोर खेळांच्या सुविधा उपलब्ध केल्या जाणार असून, खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी माहिती नगरसेवक बोरस्ते यांनी दिली. मेळा बसस्थानक परिसरात वाहनतळ उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रा. फरांदे यांनी सांगितले.
आमदार तथा नगरसेविक देवयानी फरांदे आणि अजय बोरस्ते यांनी दिला शब्द...
- मुरकुटे सभागृहात विविध सुविधा उपलब्ध केल्या जातील. सभागृहाची दुरुस्ती करण्यात येईल.
- पोलिस गस्त वाढविण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला जाईल.
- जुनी पंडित कॉलनी भागात नवीन जलकुंभ उभारण्यात येईल.
- मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात येईल.
- प्रमोद महाजन उद्यानात ग्रीन जिम उभारण्यात येईल.
- स्वच्छता राखण्यासाठी घंटागाडी नियमित केली जाईल, तसेच सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...