आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - शहरातील चार मल्टीसिस्टिम ऑपरेटरांकडील (एमएसओ) ग्राहकांसह जवळपास सव्वादोन लाख टीव्हीधारकांनी मार्चअखेर सेट टॉप बॉक्स बसवले आहेत. सुमारे 20 टक्के ग्राहकांसाठी बॉक्स शिल्लक नसल्याने शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी दहा दिवस लागणार असल्याचे एमएसओंकडून सांगण्यात आले.
केंद्र शासनाने डिजिटल अँड्रेसेबल सिस्टिम (डॅस) लागू करत देशातील 38 शहरांत 31 मार्चला मध्यरात्री अँनालॉग सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या दोन दिवसांत झालेली मागणी आणि उपलब्ध बॉक्स कमी पडत असल्याने सर्वांना बॉक्स देणे शक्य झाले नाही.
डेन नेटवर्कच्या डेन एनसीसीएन आणि डेन पीएनसीएनचे जवळपास दोन लाख 20 हजार ग्राहक आहेत. त्यापैकी एक लाख 80 हजार ग्राहकांनी बॉक्स बसवल्याचे सांगण्यात आले. उर्वरित 40 हजारांसाठी 15 हजार बॉक्स उपलब्ध असून, ते दोन दिवसांत आणि 25 हजार ग्राहकांचे बॉक्स त्यानंतर आठ दिवसांत बसविले जातील. हाथवेचे 20 हजार ग्राहक असून त्यापैकी 19 हजार 40 ग्राहकांनी बॉक्स बसवले. इन केबलची ग्राहकसंख्या अवघी 15 हजार असतानाही त्यांनी सुमारे 10 हजार ग्राहकांनाच बॉक्स दिले आहेत.
उपजिल्हाधिकार्यांना साकडे
मार्चअखेर व परीक्षा यामुळे मुदतीपर्यंत 40 टक्के ग्राहकांपर्यंत सेट टॉप बॉक्स पोहोचलेच नसल्याची तक्रार करीत मुदत वाढवून देण्याची मागणी इन व हाथवे केबल ऑपरेटर आणि एमएसओंनी उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांच्याकडे केली. सोमवारी ठाणे, पुणे, औरंगाबाद येथे अँनालॉग सिग्नल बंद झाले नसून, केवळ नागपूरमधील काही भाग आणि नाशिकमध्येच ते पूर्णपणे बंद झाले आहेत. इतर शहरांप्रमाणे नाशिकमध्येही मुदत दहा दिवस वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, हा निर्णय ट्रायचा असल्याने स्थानिक स्तरावर काही करता येणार नसल्याचे सांगत जाधव यांनी सेट टॉप त्वरित बसवण्याच्या सूचना केल्या.
शंभर टक्के वसुली
करमणूक विभागाची वसुली मागील आर्थिक वर्षाच्या 17 कोटी 41 लाख रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 17 कोटी 49 लाख रुपये झाली आहे. केबलग्राहक, डीटीएच, सिनेमागृह, व्हिडिओकोच, करमणुकीच्या पाटर्य़ा यांच्याकडून ही वसुली झाली आहे. जिल्ह्यात एक लाख 64 हजार 423 डीटीएचधारक आहेत.
ग्रामीणसाठी स्वतंत्र यंत्रणेचे आदेश
केबल नेटवर्कचे जाळे ग्रामीण भागातही पोहोचले आहे. त्यामुळे तेथेही केबल प्रक्षेपण बंद झाले आहे. हा निर्णय ग्रामीण भागात लागू नसल्याने त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचे आदेश यापूर्वीच एमएसओंना देण्यात आले आहेत. मात्र, 31 मार्च व 1 एप्रिलच्या मध्यरात्री ते बंद राहिले.
मागणी आठ दिवसांपासून
मी आठ दिवसांपासून मागणी करतोय; मात्र केबलचालक बॉक्स आठशे की बाराशे रुपयांचा पाहिजे, अशी विचारणा करत प्रत्यक्षात येतच नाही. संजय ठाकरे, ग्राहक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.