आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण-बलात्काराच्या गुन्ह्यात 16 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नाशिकमध्ये अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पंजाब राज्यातील जिल्हा होशियारपूरच्या तांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने युवतीचे अपहरण करुन 16 वर्षापुर्वी बलात्कार केला होता. या आरोपीला नाशिक येथे अटक करण्यात आली आहे. आरोपी सुखदेव वनान सिंग(45, रा. ओहरपूर, तांडा) हा तेव्हापासून फरार होता.
 
पंजाब पोलिस सातत्याने त्याच्या मागावर होते; मात्र सुखदेवसिंग हा त्यांच्या हातावर तुरी देत होता. काही वर्षांपुर्वी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या सुखदेवची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती. पंजाब पोलिसांनी मुंबईमध्ये जाऊन सुखदेवला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. सुखदेव तेथूनही पोलिसांच्या तावडीतून निसटला. त्यानंतर मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ कोर्टाच्या आदेशान्वये या आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होते. हे पथक नाशिकमध्ये येऊन धडकले.
 
पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल व उपआयुक्त विजय मगर यांची पथकाने भेट घेऊन गुन्हयात फरार असलेल्या सुखदेवची माहिती सांगितली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-2 कडे याप्रकरणी जबाबदारी सोपविण्यात आली. पंजाब पोलिसांच्या पथकाकडून युनिटचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गंगाधर देवडे यांनी संशयित फरार आरोपीची माहिती व छायचित्र मिळविले. त्यानुसार सर्व गोपनिय स्तरावर देवडे व त्यांच्या पथकाने माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. हा आरोपी लहवित परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार देवडे यांनी लहवित गावात जाऊन पोलिस पाटील यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात संशयित आरोपी सुखदेव सिंग यास शिताफीने अटक केली.
 
 
बातम्या आणखी आहेत...