आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'one Window' System Now Start In Commissioner Office

परवाने मिळणार एकाच खिडकीतून, आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच कक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -पोलिस आयुक्तालयाकडून नागरिकांना दिल्या जाणार्‍या विविध प्रकारच्या 15 परवान्यांसाठी ‘सतरा टेबल आणि पाच-पंचवीस अधिकार्‍यांकडे’ करावी लागणारी विचारणा आता टळणार आहे. मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर नाशिकच्या पोलिस आयुक्तालयात 7 जानेवारीपासून सुरू होणार्‍या नागरिक सुविधा केंद्राच्या ‘वन विंडो सिस्टिम’च्या माध्यमातून हे सर्व परवाने एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
पोलिस आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच त्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून, येथून तब्बल 13 प्रकारचे परवाने नागरिकांना मिळतील. नागरी सुविधा केंद्राचा हा कक्ष प्रवेशद्वाराजवळच असल्याने नागरिकांना आयुक्तालयाच्या अंतर्गत भागात जाण्याची आवश्यकता उरणार नाही. त्यामुळे आयुक्तालयाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. या कक्षाची पाहणी गुरुवारी पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी करून काही मार्गदर्शक सूचना केल्या.
मुंबई व ठाण्यातच होती सुविधा :
एकाच कक्षातून सर्व प्रकारचे परवाने केवळ मुंबई आणि ठाण्यातच मिळत होते. त्याच धर्तीवर आता नाशिक पोलिस आयुक्तालयातून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
हे परवाने मिळू शकतील
पासपोर्ट पडताळणी, चारित्र्य पडताळणी, शस्त्र परवाना (नवीन, नूतनीकरण, प्रवास परवानगी, खरेदी - विक्री ), तात्पुरता व कायमस्वरूपी फटाका परवाना, लॉजिंग, खाद्यगृह, सार्वजनिक करमणूक परवाना, सायबर कॅफे, स्वीमिंग पूल, सिनेमागृह (मल्टिप्लेक्स) परवाना , व्हिडिओ गेम पार्लर परवाना, चॅरिटी शो, सर्कस, तमाशा, नाटक परवानगी व खासगी सुरक्षा यंत्रणा अभीकरण परवाना.
‘सीसीटीएनएस’ कार्यान्वित होणार
राज्य पोलिस दलात क्राइम अँण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँण्ड सिस्टिम अर्थात ‘सीसीटीएनएस’ ही ऑनलाइन महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्यातील 10 आयुक्तालये, 35 पोलिस अधीक्षक कार्यालये, पोलिस ठाण्यापासून राज्य पोलिस मुख्यालय व केंद्रीय पोलिस संघटना या योजनेत जोडल्या आहेत. यामुळे माहितीची साठवणूक करतानाच शोध, चौकशी व गुन्हेगारांच्या माहितीचीही देवाणघेवाण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.