आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरेदीदारांअभावी कांदा ८०० रुपयांनी घसरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक घटल्याने आणि परराज्यातून मागणी वाढल्याने कांदा दरात ४३०० रुपयांपर्यंत वाढ झाली. परंतु, त्याचा परिणाम म्हणून ग्राहकांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरविल्याने त्याचवेळी परराज्यातूनही मागणी घटल्याने बुधवारी दरात ८०० रुपयांनी घसरण झाली. कमाल दर ३५०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात उच्च प्रतिचा कांदा हा ३५ ते ४० रुपये दराने विक्री होत आहे.
यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कांदा क्षेत्राचे नुकसान झाले. जो कांदा पक्व झाला होता, त्यामध्ये पाणी गेल्याने ताे लवकर खराब झाला. त्यामुळे सुरुवातीला एप्रिल, मे महिन्यात कांदा चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला. ज्या भागात गारपीट आणि पाऊस झाला नाही, त्या भागातील कांद्याची प्रत ही उत्तम असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवला होता. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असला तरी बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्याने त्यांना अजूनही शासनाकडून मदत मिळाली नाही. सध्या लासलगाव, पिंपळगाव, सटाणा, मुंगसे, सायखेडा, येवला, दिंडोरी, कळवण, सिन्नर, नायगाव येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने गत आठवड्यापासून दरात वाढ होत हाेती. मात्र, कांद्याचे दर आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहकांनी कांदा खरेदीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, आणि बिहारमधूनही मागणी कमी झाल्याने दरात घसरण होत आहे.

अाणखी घसरण शक्य
दक्षिणभारतातील कांदा आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता असल्याने, ताे विक्रीसाठी येताच देशांतर्गत बाजारपेठेतील पुरवठा अाणखी वाढेल. त्यामुळे घाऊक अाणि किरकाेळ दरात अजून घसरण होण्याची शक्यता आहे. निर्यातमूल्य जास्त असल्यानेही दर नियंत्रित राहतील.