आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Export Banned Due To Less Production, Increases Rate

घटती आवक, बाजारातील वाढत्‍यादरामुळे कांद्यावर पुन्हा निर्यातबंदी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कांद्याचे दर जुलैमध्ये 2700 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात त्याची प्रतिकिलो 30 ते 35 रुपये दराने विक्री होत आहे. घटती आवक आणि बाजारातील वाढते दर पाहून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा विचार सुरू केला आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी केंद्राच्या या प्रस्तावाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातबंदी झालीच तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नवी दिल्लीतील संसद भवनासमोर आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आणि निर्यातबंदी हे दोन्ही मुद्दे पेटण्याची शक्यता आहे.

भारतातून दर आठवड्याला सुमारे 32 हजार मेट्रिक टन कांद्याची निर्यात होते. मात्र, सध्या परदेशातही उन्हाळ कांद्याचे दर वाढल्याने निर्यातीत घट झाली आहे. सध्या तीन हजार 700 मेट्रिक टन म्हणजे केवळ 15 टक्क्यांच्या आसपास कांदा निर्यात होतो. देशांतर्गत बाजारपेठेत आवक कमी असल्यानेच दर वाढले आहेत. तसेच, मागणी सतत वाढती असल्याने किरकोळ दरात वाढ होत आहे. या मुद्यावर एकेकाळी केंद्रातील सरकार कोसळलेले असल्यामुळे आता पुन्हा सरकारने किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कांदा निर्यातबंदी करण्याचा विचार सुरू केला आहे.


सरकारला धडा शिकविणार
कांदा निर्यातबंदी केली तर सरकारला चांगलाच धडा शिकविण्यात येईल. हजारो मेट्रिक टन कांदा भारतात पडून आहे. दोन पैसे मिळायला लागले की लगेच इतरांच्या सांगण्यावरून मंत्री, सचिव निर्णय घेतात. मात्र, या वेळी कांदा निर्यातबंदी झाल्यास संघटनेचे कार्यकर्ते संसदेसमोर आत्मदहन करतील. दीपक पगार, विभागीय अध्यक्ष


आता फक्त गोळ्या चालवाव्या
आता शेतकर्‍यांनीच कांदा न पिकविण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्याऐवजी दुसरी फळे आणि भाजीपाला घ्यावा. ग्राहकांनाही समजू द्या की, कांद्याची चव कशी असते? कांदा लागवडीची वेळ आल्यावर हे प्रकार मुद्दाम केले जातात. त्यापेक्षा शासनाने शेतकर्‍यांवर थेट गोळ्याच चालवाव्यात. चांगदेव होळकर, संचालक, ‘नाफेड’


तर निर्माण होईल चीन, पाकिस्तानचे वर्चस्व
सध्या चीन आणि पाकिस्तानचा कांदा बाजारात येत असल्याने भारतातून केवळ 15 ते 20 टक्के कांदा निर्यात होत आहे. तसेच, सध्या हैदराबाद, कर्नाटक या भागात काही प्रमाणात नवीन कांदा बाजारात यायला लागला आहे. केवळ देशांतर्गत मागणी वाढली असल्याने निर्यातबंदी करण्याची गरज नसल्याचे व्यापारी आणि शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारपेठेत कांद्याची अशीच परवड सुरू राहिली तर भविष्यात भारतीय कांद्यावर चीन आणि पाकिस्तानी उत्पादकांचे कायम वर्चस्व राहण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.