आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...‘त्या’ शेतकऱ्याने केली इच्छा मरणाची मागणी, मुख्यमंत्र्यांना पाठविले परवानगी मागणीचे पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला- कांद्याच्या घसरत्या भावाने उत्पादन खर्चही निघत नसल्याने हतबल झालेले नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी काळजावर दगड ठेवत आपल्या शेतातील उभा कांदा मागील महिन्यात जाळून टाकला होता. याबाबत अनेक नेतेमंडळींनी भेटी देऊन केवळ चर्चाच केली, तर राज्य सरकारच्या या शेती व्यवसायविषयक धोरणांमुळे  आलेल्या अपयशामुळे व नैराश्यतेमुळे इच्छा मरणाची परवानगी कृष्णा डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या एका पत्रान्वये केली आहे.

नगरसूल येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी मागील महिन्यात कांदा भावाच्या घसरणीमुळे काढणीला आलेले पाच एकर कांदा पीक स्वत: जाळून टाकले होते.  तसेच, आजही शेतमालाच्या भावासंदर्भात शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणाला कंटाळून इच्छा मरणास परवानगीकामी डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.  त्यांनी पत्रात नमूद केले आहे की, लहानपणी त्यांच्या वडिलांची अचानक दृष्टी गेली तेव्हापासून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अर्जदार यांच्यावरच आहे.  

अर्जदार यांचे मूळ गाव नांदगाव तालुक्यातील असून, तेथील असलेली कोरडवाहू शेतीत उदरनिर्वाह होत नसल्याने ते सुमारे २० वर्षांपूर्वी नगरसूल येथे नातेवाइकांच्या आश्रयाला कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी आले.  नगरसूल येथे नातेवाइकांची असलेली जमीन वाट्याने व काही शेतकऱ्यांची शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेती व्यवसाय सुरू केला.  सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक हानी यामुळे शेती व्यवसायात फारसे उत्पन्न कधीच मिळाले  नाही.  मात्र, उदरनिर्वाहासाठी शेती हाच एक पर्याय असल्यामुळे शेतीत माझे संपूर्ण कुटुंब अहोरात्र मेहनत करीत कसाबसा उदरनिर्वाह भागवत आले. परंतु, कधी दुष्काळ तर कधी गारपीट तर कधी कोसळलेले शेतमालाचे बाजारभाव यामुळे मी व माझे कुटुंब कर्जबाजारी झाले. त्यात गतवर्षी येवले तालुक्यात दुष्काळ पडल्याने पोटापाण्यासाठी कन्नड तालुक्यात जाऊन भाड्याने जमीन घेऊन आठ एकर उन्हाळ कांदा लागवड केली.  

निसर्गाच्या कृपेने कांदा पीक चांगले येऊन उत्पादनही १०० टक्के निघाले.  निघालेल्या कांदा उत्पादनाची कांदा चाळीत साठवणूक करून बाजारात विक्री करण्यासाठी ठेवला.  परंतु, कांदा बाजारात नेण्यापूर्वीच कांद्याचे कमालीचे भाव घसरल्याने संपूर्ण कांदा हा चाळीतच सडला व माझे जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाले.  यंदा पाऊस चांगला झाल्याने मी नगरसूल येथे कांद्याचे उत्पादनासाठी खासगी फायनान्स कंपनीचे दीड लाख रुपयांचे कर्ज काढले. उधार उसनवारी केली, घरातील महिलांचे दागदागिने मोडले अशा सर्व मार्गाने पै-पैसा जमा करून कांद्याचे उत्पादन घेतले होते. त्यातून पीक उत्तम आले, परंतु शासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कांदा पिकाचे दर घसरल्याने माझा किमान उत्पादन खर्चदेखील फिटेनासा झाला.  
डोक्यावर वाढलेले कर्ज फेडायचे कसे असा यक्षप्रश्न आमच्या पुढे उभा आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने वैतागून त्यांनी उभे काढणीला आलेले पाच एकर कांदा पीक स्वत: जाळून टाकले. इतके घडूनही राज्यातील सत्ताधारी मंत्रिमंडळातील किंवा पक्षातील एक पदाधिकारी त्यांना धीर देण्यासाठी येऊ शकले नसल्याची मनाला खंत बाळगत सरकार जर शेतकऱ्यांच्या संकटात धीर देऊ शकत नसेल, शेतमालाच्या होणाऱ्या नुकसानीस भरपाई तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नसेल तर मला इच्छा मरण घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी याचना डोंगरे यांनी त्यांच्या पत्रात केली आहे.
बातम्या आणखी आहेत...