आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याला विक्रमी सहा हजार भाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन - कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या कांदा बाजारपेठेत रविवारी कांद्याला प्रतिक्विंटल सहा हजार शंभर रुपये असा विक्रमी भाव मिळाला. यामुळे शेतकर्‍यांची चांदी झाली आहे. मात्र, सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

बाजार समितीत गेल्या पंधरा दिवसांपासून व्यापारी व शेतकर्‍यांत कांद्याच्या दरावरून तू तू मै-मै सुरू होते. या दरम्यान अनेक वेळा कांद्याचा लिलावही बंद पडायचा. रविवार, 11 रोजी झालेल्या कांद्याच्या लिलावादरम्यान शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाला. माजी सभापती कडुबा हिवाळे व जनार्दन पवार, संचालक दादासाहेब जगताप, अंबादास गायकडे यांनी प्रत्यक्ष हजर राहून लिलावास सुरुवात केली. या लिलावात चार हजार ते सहा हजार शंभर रुपये भाव देण्यात आला. असा विक्रमी भाव कांदा मार्केट सुरू झाल्यापासून प्रथमच मिळाल्याने शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण होते.

मागील बुधवारी काही कांदा व्यापार्‍यांनी बाजार समिती प्रशासनास पूर्वकल्पना न देता आडत बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच फजिती झाली होती. अखेर संचालक मंडळांनी यात लक्ष घातल्याने रविवारी सुरळीत लिलाव झाला. इतर कांदा मार्केटप्रमाणेच शेतकर्‍यांच्या कांद्याला भाव देण्यासाठी लासूर बाजारपेठ सज्ज असल्याचे सभापती कृष्णा पाटील डोणगावकर, उपसभापती दिनेश मुथा यांनी सांगितले. या वेळी रवींद्र पोळ, सचिव आर. एस. काकडे, सहसचिव किशोर पोकर्णे, कारभारी रणयेवले, रामदास तायडे आदी उपस्थित होते.