आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion On 5 Thousand Rupee, Red Onion Come In Market

कांद्याला 5 हजारांचा भाव,लाल कांद्याची विक्रमी आवक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालेगाव - दसर्‍याच्या मुहूर्तावर उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती व मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर रविवारी लाल कांद्याच्या लिलावास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी कांद्याची विक्रमी आवक झाली. उमराणेत लाल कांद्याला सर्वोच्च 5 हजार 101 रुपये इतका भाव मिळाला, तर मुंगसेत 4 हजार 100 रुपये सर्वोच्च भाव मिळाला.

दरवर्षी लाल कांद्याच्या लिलावाची सुरुवात दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येते. यंदाही ही परंपरा कायम राहिली. मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीपासून विभक्त झाल्यानंतर प्रथमच उमराणे कृउबाने हा लिलाव साधला. बाजारात लाल कांद्याची आवक साडेसहा हजार क्विंटल होती. व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रविणलाल बाफना यांच्या हस्ते नारळ वाढवून लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम लिलावास आलेल्या गिरणारे येथील शेतकरी दावल चिंधा महाले यांच्या कांद्याला सर्वोच्च 5 हजार 101 रूपये भाव मिळाला. 11 बैलगाडी, 250 ट्रॅक्टर, 350 पिकअप अशा एकूण 650 वाहनांमधून कांदा बाजारात आला. कमीत कमी 1 हजार 111 तर जास्तीत जास्त 5 हजार रुपये प्रतिक्विंटल कांदा विकला गेला.


सरासरी भाव 3 हजार 150 रुपये एवढा राहिला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव सोपान दुकळे यांनी दिली. याचप्रमाणे मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे केंद्रावरही लाल कांद्याच्या लिलावाचा शुभारंभ झाला. मुंगसेत जवळपास 261 वाहनांद्वारे अडीच हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला 4 हजार 100 रुपये भाव मिळाला. प्रतिक्विंटल कमीत कमी 700 रुपये तर जास्तीत जास्त 4 हजार रूपये भाव राहिला.


उन्हाळ कांद्यावर परिणाम नाहीच
लाल कांद्याची आवक यंदा चांगली आहे. भावदेखील अपेक्षेपेक्षा जास्त आहे. लाल कांद्याने भावाची सरासरी उन्हाळ कांद्यापेक्षा जास्त गाठली असली तरी उन्हाळ कांद्यावर याचा फारसा परिणाम होणार नाही. उन्हाळ कांद्यालादेखील चांगली मागणी आहे. सध्या अशा कांद्याला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल सरासरी भाव मिळत आहे, अशी माहिती व्यापार्‍यांकडून देण्यात आली.