आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यात घसरण, शहरात १५ ते २० रुपये किलो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढून सामान्य ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्राने कांदा निर्यातमूल्यात १७५ डॉलरने वाढ केली आहे. या निर्णयाचा परिणाम निर्यातीवर झाल्याने बाजार समित्यांमध्ये कांदादरात घसरण होऊन प्रतिक्विंटल दोन हजार रुपये दराने विक्री होणारा कांदा सोमवारी थेट १६०० ते १७०० रुपये प्रति क्विंटलने विकला गेला. तर, सरासरी दर हा १३०० ते १४०० रुपये झाल्याने कांदा उत्पादकांसह आडतदार व्यापारी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश आडतदार आणि व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक करून ठेवली असल्याने जोपर्यंत साठवणूक केलेला कांदा विक्री होत नाही तोपर्यंत व्यापारी दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
शहरातील भाजीबाजारात अद्याप कांदा हा १५ ते २० रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, केवळ दिल्ली शहरात कांद्याचे दर वाढल्याने केंद्र सरकारने कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यात कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कांदा निर्यातमूल्य २५० वरून ४२५ डॉलर प्रतिटन केल्याने भारतातून बाहेरील देशात जाणाऱ्या कांद्यावर अप्रत्यक्ष निर्यात बंदी लादली गेली.

त्यामुळे लासलगाव, पिंपळगाव, दिंडोरी, कळवण, सिन्नर, येवला, मुंगसे, उमराणे येथील बाजार समित्यांमध्ये कांदा दरावर परिणाम झाला. दोन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता १६०० रुपये दरावर आला आहे. मात्र, प्रत्यक्षात बाजार समित्यांमध्ये १३०० पासून ते १७०० रुपये दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांची चलबिचल
बहुतांशउत्पादक हे उन्हाळ कांद्याला चांगला दर प्राप्त होईपर्यंत साठवणूक करतात. मात्र, यावर्षी दरवाढीची चिन्हे निर्माण होताच शासनाने निर्यातमूल्यात वाढ केली. तसेच विदेशातून कांदा आयात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या अाहेत. त्यामुळे कांदा आयात केल्यास मागणीच्या तुलनेत अधिक पुरवठा झाल्यास दरात आपोआप घसरण होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

व्यापाऱ्यांचे दर स्थिर ठेवण्याचे प्रयत्न
जिल्ह्यातीलअनेक कांदा व्यापारी आणि आडतदारांनी मार्च, एप्रिल महिन्यात येणाऱ्या उन्हाळ कांद्याचे दर कमी असल्याने खरेदी करून ठेवले होते. त्यामुळे आता पुन्हा दरात घसरण झाल्यास आणि साठवणूक केलेला कांदा खराब झाल्यास नुकसानीपासून बचाव करण्यासाठी हाती असलेल्या कांद्याची विक्री होईपर्यंत दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...