आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Onion Price In Nashik On 70 Rupee, 80 Rupee In Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांद्याची नाशकात 70, मुंबईत 80 रुपये किलो दराने होते विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मागणी आणि आवक यांचे समीकरण जुळत नसल्यामुळे बाजार समितीत सध्या कांद्याचे दर सातत्याने वाढतच आहेत. किरकोळ बाजारात कांदा प्रतिकिलो 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. मुंबईत हा दर 80 रुपये किलो आहे. पिंपळगाव बाजार समितीत मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार 51 ते चार हजार 951 रुपये दर मिळाला असून, सरासरी दर चार हजार 400 रुपये होता.


पावसामुळे आर्द्रता कायम असल्याने चाळीत साठविलेला कांदा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील आवक आणखी घटण्याची शक्यता आहे. परिणामी, कांद्याच्या दराचा आलेख चढताच उपलब्ध असलेल्या कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात दर वाढल्याने ग्राहकांनी कांदा खरेदी टाळल्यामुळे व्यापारीदेखील जादा दराने कांदा खरेदीचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता आवक घटली तरी भाव वाढवून मिळेल की नाही, याचीही भीती काही शेतकर्‍यांनी व्यक्त केली.


साठा खराब होण्याची भीती
15 ऑगस्टनंतर कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढते. वातावरणात 70 ते 75 टक्के आद्र्रता असल्यास कांदा अधिक टिकू शकतो. मात्र, सध्या हे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने साठविलेला कांदा खराब होऊन त्याचे दर कमी होऊ शकतात.
डॉ. सतीश भोंडे, माजी सहसंचालक राष्ट्रीय फलोत्पादन आणि भाजीपाला संशोधन केंद्र


बियाणे मिळणेही होणार अवघड
पुढील वर्षासाठी बियाणे तयार करण्यासाठी कांदा शिल्लक राहण्याची शक्यता कमी आहे. कारण यावर्षी कांद्याला अधिक दर मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीला प्राधान्य देत आहेत. परिणामी बियाण्याची टंचाईदेखील आगामी काळात जाणवू शकते, अशी शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.


असा टिकतो कांदा, अशी होते घट
रब्बी (उन्हाळ) कांदा हा एप्रिल महिन्यात काढला जातो. कांदा काढल्यानंतर काही प्रमाणात सुकविल्यानंतर तो मे महिन्यापासून साठविला जातो. तो पाच महिने चांगला राहू शकतो. त्यानंतर मात्र तो खराब होण्याच्या प्रमाणात वाढ होते.

त्याचे प्रमाण असे :
कालावधी वजन घटीचे प्रमाण
जून (पहिला महिना) 4 ते 5 टक्के
जुलै (दुसरा महिना) 8 ते 10 टक्के
ऑगस्ट (तिसरा महिना) 7 ते 8 टक्के (15 टक्के तोटा)
सप्टेंबर (चौथा महिना) 7 ते 9 टक्के (20 टक्के तोटा)


काकडी, मुळ्याला पसंती
कांद्याचे दर वाढल्यामुळे हॉटेलचालकांनी कोबी, काकडी आणि मुळा हे प्रकार खरेदी करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळे कोबीचे दर वाढले आहेत. - बाळा शिंदे, भाजीपाला विक्रेते