आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यासाठी ग्राहकांना किलोमागे 40 रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लाल कांद्याचा हंगाम सध्या अखेरच्या टप्प्यात असून, भाव कमी होण्यासाठी आता केवळ उन्हाळा कांद्यावर विसंबून राहावे लागणार आहे. मात्र, पाणीटंचाईमुळे उत्पादनात सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांना किलोसाठी 40 रुपयांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
कमी पावसामुळे यंदा 11 हजार 941 हेक्टर कमी लागवड झाली. तर आर्द्रतेमुळे साठवणूक होत नसल्याने सध्या विक्रीसाठी गर्दी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने जानेवारीपासून आतापर्यंत सरासरी भाव 1438 ते 1820 रुपये दरम्यान आहे. लासलगाव, पिंपळगाव व मनमाड बाजार समित्यांत नोव्हेंबरमध्ये 17 टक्के, डिसेंबरमध्ये 1 टक्का, तर जानेवारीत 4 टक्के आवक घटली. मात्र, दरात अनुक्रमे 33 टक्के, 101 टक्के आणि 257 टक्क्यांनी भाववाढ झाली. यापुढे किरकोळ भाव 40 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

यामुळे भाववाढ
रेल्वेने कांदा वाहतूक बंद असल्याने नाशिक जिल्ह्यातून रोज सुमारे एक हजाराहून अधिक ट्रकने कांदा वाहतूक सुरू आहे. मात्र, डिझेल व टोलमुळे गेल्यावर्षीपेक्षा यंदा एका ट्रकमागे सुमारे पाच ते सहा हजार रुपये अधिक भाडे मोजावे लागत आहे. त्यामुळे परराज्यातील शहरांत जाणा-या कांद्यात घट झाल्याने तेथे भाववाढ होईल.

पाण्यावर सारे अवलंबून
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कांद्याला पाणी मिळाले तर कांदा उत्पादनात वाढ होईल. मात्र, पाणी मिळाले नाही तर 50 टक्के कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.’’
भाऊलाल कुंभार्डे, कांदा उत्पादक

निर्यातबंदीची गरज नाही
सरासरी 15 टक्क्यांपर्यंत निर्यात झाली तरी निर्यातबंदी करण्याची गरज नाही. कांद्याची भाववाढ झाल्याने लगेच निर्यातबंदी करण्याची आवश्यकता नाही.’’
डॉ. सतीश भोंडे, अतिरिक्त संचालक, एनएचआरडीएफ