आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजार समितीत कांदा पाच रुपये, तर बाजारात 20 रुपये किलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बाजार समितीत गावठी कांद्याची मोठी आवक सुरू झाल्याने दरात घसरण झाली आहे. गावठी कांद्याला प्रतिक्विंटल 450 ते 500 रुपये, तर लाल कांद्याला 600 ते 650 रुपये दर मिळत आहे. बाजार समितीत कांद्याची 5 रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.

किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना 20 रुपये किलोने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे एकीकडे शेतकरी भरडला जात आहे, तर दुसरीकडे ग्राहकांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे.

उन्हाळ कांद्याची आवक कमी असताना वाढीव दराचा मोजक्या उत्पादकांनाच फायदा झाला. मात्र, सध्या लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, नायगाव, सिन्नर, सायखेडा, सटाणा, नांदगाव, मनमाड, उमराणे येथील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात होत असल्याने दर घसरल्याने सर्वच उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे. बाजारात दर वाढल्यावर केंद्राचे अधिकारी थेट कांदा खरेदी करण्यासाठी दिल्लीहून नाशिकमध्ये येतात. मात्र, दर कमी झाल्यावर कोणीही अधिकारी विचारण्यासाठी येत नसल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

योग्य मार्गदर्शनाची गरज
केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाचे शास्त्रज्ञ व वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्षात कांद्याची किती लागवड झाली किंवा उत्पादकांना कांद्याऐवजी दुसरे पीक घेण्याची सूचना करीत नसल्याने उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. त्यामुळे मातीमोल दराने कांद्याची विक्री होते.

विनाकारण बसतेय झळ
किरकोळ बाजारातील लहान व्यापारी जास्त दराने कांदा विक्री करीत असल्याने सामान्य ग्राहकांना अधिक दराने कांदा खरेदी करावा लागतो. परिणामी विनाकारण दरवाढीला सामोरे जावे लागते. सविता जाधव, गृहिणी

.तरी व्यापारीच होतात बदनाम
जादा आवकेमुळे दरात घसरण झाली आहे. समितीत पाच ते सहा रुपये किलो दराने खरेदी होणारा कांदा बाजारात मात्र 20 रुपये किलोने विक्री होतो. तरीही कांदा खरेदी करणारा व्यापारीच बदनाम होतो. इम्तियाज पटेल, व्यापारी