मनमाड - कांदा लोडिंगसाठी मालधक्क्यावर उभ्या राहणार्या मालगाडीची निर्धारित वेळ टळली तर विलंब शुल्क आकारणीच्या दरात रेल्वेने चौपट वाढ केली आहे. त्यामुळे व्यापार्यांनी पाच दिवसांपासून परप्रांतात कांदा पाठविणे बंद केले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांदा स्वस्त होण्याची चिन्हे आहेत.
रेल्वे आणि व्यापार्यांच्या भांडणात कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा खरेदीदार ग्राहक भरडला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे व कांदा व्यापार्यांच्या या भांडणात परप्रांतातील ग्राहकांना जादा दराने कांदा खरेदी करण्याची वेळ येऊ शकते. कारण, चार-पाच दिवसांपासून देशातील बाजारपेठेत रेल्वेने कांदा रवाना झालेला नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन त्याचा फटका ग्राहकांना बसेल, अशी शक्यता आहे. मात्र, स्थानिक बाजार समित्यांत कांद्याची आवक वाढत असल्याने आणि व्यापारी कांदा पाठवत नसल्याने नाशिकमध्ये कांदा दर बाजार समित्यांत घसरण्याची शक्यता आहे.
रेल्वेने कांदा पाठवण्यासाठी व्यापारी मनमाड, लासलगाव, निफाड या मालधक्क्यांवरून कांदा व्ॉगनमध्ये लोड करतात. कांदा भरण्यासाठी रेल्वेने व्यापार्यांना निर्धारित वेळ (डेम्रेज) दिलेली आहे. ती जर टळली तर व्यापार्यांना दीडशे रुपये भुर्दंड सोसावा लागतो. रेल्वेने या दरात चौपट वाढ केल्याने तो आवाक्याबाहेर असल्याचे मत व्यापार्यांचे आहे. त्यामुळे व्यापार्यांनी गेल्या सहा दिवसांपासून व्ॉगनमध्ये कांदा भरणे थांबविले आहे. त्यामुळे परप्रांतात पूरक प्रमाणात कांदा जात नाही. यामुळे व्यापार्यांकडे मोठय़ा प्रमाणात कांद्याचा साठा शिल्लक आहे.
बाजार समित्यांमध्येही कांद्याची आवक अधिक होत असल्याने कांद्याच्या दरावर परिणाम होत असल्याची ओरड शेतकर्यांमध्ये आहे.
20 हजार क्विंटल आवक
सहा दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने निर्धारित वेळेच्या जादा दराबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने आणि व्यापार्यांनी कांदा भरणे बंद केल्याने या आडमुठय़ा धोरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकरी आणि परप्रांतातील ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी मनमाड बाजार समितीत 20 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यामुळे कांदा दरात प्रतवारीनुसार सरासरी आणि सर्वोच्च दरावर परिणाम झाल्याचे शेतकर्यांनी बोलून दाखविले. रेल्वेने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असा आग्रह निर्यातदार व्यापार्यांनी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे धरला आहे.