आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Price News In Marathi, Satana Agriculture Producing Market, Farmers

सटाण्यात कांदा 25 पैसे किलो, शेतकर्‍यांनी संतप्त होऊन लिलाव बंद पाडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा - आधीच गारपीट व अवकाळी पावसाने हैराण झालेला शेतकरी आता सुलतानी संकटामुळे त्रस्त झाला आहे. सोमवारी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा लिलाव किमान 25 पैसे किलोने झाला. यामुळे शेतकर्‍यांनी संतप्त होऊन कांदा लिलाव बंद पाडले. शेतकर्‍यांनी सुमारे तीन तास बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बंद पुकारल्याने बाजार समिती प्रशासनासहित पोलिसांचीही प्रचंड धावपळ झाली.


लिलावात व्यापार्‍यांकडून होणारा अडथळा, पाच दिवसांपासून बंद असलेले कांदा मार्केट आणि 25 पैसे प्रतिकिलो भाव लिलावात पुकारल्यामुळे शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांवर हल्लाबोल केला. शेतकर्‍यांचा संताप आणि जमाव बघून व्यापार्‍यांनी लिलावातून पळ काढला. सचिव अशोक भामरे, संचालक भिका सोनवणे, पोलिस निरीक्षक भागवत जायभावे यांनी शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी झाला. शेतकर्‍यांनी तीन तास बाजार समितीच्या कार्यालयात तळ ठोकला. सभापती आल्याशिवाय पुढील लिलाव होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते संजय वाघ, सचिव अशोक भामरे, भिका सोनवणे यांची तातडीची बैठक होऊन मंगळवारी जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणेच कांद्याचा लिलाव होईल, असे ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे 104 ट्रॅक्टरचे लिलाव झाले नसून, ते मंगळवारी करणार असल्याचे सांगण्यात आले.