आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Price News In Marathi, Union Government Of India, Divya Marathi

कांदा दरवाढीच्या शक्यतेने केंद्र सरकार खडबडून जागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गारपिटीमुळे शेतमाल व फळपिके मातीमोल झाल्याने केंद्र सरकारचेही धाबे दणाणले असून, केंद्रीय समितीपाठोपाठ खास कांदा पिकाचा आढावा घेण्यासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचे सहसचिव डॉ. डी. के. जैन यांनाही महाराष्ट्राचा धावता दौरा करावा लागला.लासलगाव या कांद्याच्या प्रमुख बाजारपेठेलाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. तथापि, आम्ही केवळ कांद्याची प्रत, उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित केले असून, नुकसानीबाबत आताच काही सांगता येणार नसल्याची प्रतिक्रिया जैन यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला दिली. राज्यासह परराज्यात झालेल्या गारपिटीमुळे भविष्यात कांद्याचे दर आटोक्यात राखण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे असेल. देशाच्या एकूण कांदा उत्पादनाच्या तुलनेत 30 टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्रातही कांद्याचे नुकसान झाले. त्यामुळे जागे झालेल्या सरकारने बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होण्याचा आढावा घेण्यासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनचे सहसचिव डॉ. डी. के. जैन यांचा राज्यात धावता दौरा आखला होता. राज्यात केंद्रीय समितीच्या पाहणी दौर्‍यापाठोपाठ जैन यांचाही दौरा लक्षात घेता भविष्यातील दरवाढीचा अदमास घेण्यासाठीच हा दौरा होता, असे दिसून आले.


देशात कांदा, टोमॅटो आणि भाजीपाल्याच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे कांदा, टोमॅटो, बटाटा आणि भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये कांदा हे प्रमुख अन्न नसले तरी त्याची दरवाढ ही देशात संवेदनशील परिस्थिती निर्माण करते. त्यामुळे कांद्याची उत्पादनवाढ आणि त्याची प्रत चांगली राहण्यासाठी जैन यांनी सोलापूर, औरंगाबाद, लासलगाव आणि चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंधान व विकास प्रतिष्ठानचा दौरा करून उत्पादनाबाबत माहिती घेतली. जैन यांच्या दौर्‍याबाबत स्थानिक अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांपासून गुप्तता ठेवली होती. चांगल्या प्रतीचा कांदा, उत्पादनवाढीसाठी आणि अधिक काळ कांदा साठवणूक होईल यासाठी त्यांनी शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली आणि सूचनाही केल्या.


आकडेवारीच्या तफावतीबाबत अधिकार्‍यांना समज
राष्ट्रीय बागवानी अनुसंधान केंद्र आणि कृषी विभागाच्या अधिकार्‍यांच्या कांदा उत्पादन आणि क्षेत्राबाबतच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत येत असल्याने समस्या निर्माण होत आहे. भविष्यात आकडेवारीत तफावत येणार नाही यासाठी दोघांनी समन्वय साधावा, याबाबत संबंधित अधिकार्‍यांना डॉ. जैन यांनी या वेळी चांगलीच समज दिली.


कांद्याचे उत्पादन हवामानावर आधारित हवे
पाहणी करताना त्यांना हवामानावर आधारित कांद्याचे उत्पादन होत नसल्यामुळे येणार्‍या अडचणींची माहिती घेऊन त्यांनी ‘एनएचआरडीएफ’च्या अधिकार्‍यांना भविष्यात हवामानावर आधारित कांद्याच्या उत्पादनावर संशोधन करण्याच्या सूचना केल्या. तसेच, कांद्यासोबत बटाटा, मिरची आणि इतर भाजीपाल्याच्या उत्पादनाबाबतही त्यांनी माहिती घेतली.


‘दिव्य मराठी’ने दिला होता भाववाढीचा अंदाज
गारपीट आणि बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसान आणि बियाण्यांचा भासणारा तुटवडा यावर दैनिक दिव्य मराठीने ‘कांदा होणार सव्वाशेपार’ असे वृत्त प्रसिद्ध केले होते. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा कांदा दरवाढीवर परिणाम नको म्हणून केंद्रीय अधिकार्‍यांनी कांदा उत्पादनवाढीसाठी राज्याचा दौरा घेतला.