आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यात क्विंटलमागे १७०० रुपयांची वाढ, सरासरी ५२०० भाव क्विंटलचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या केवळ २० टक्केच चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीला येत आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ३४०० ते ३८०० रुपये प्रतिक्विंटल दर असलेला कांदा आवक घटल्याने या आठवड्यात १ हजार ७०० रुपयांनी प्रतिक्विंटल वाढ होऊन गुरुवारी किमान ४,८००, तर कमाल ५,५०० आणि सरासरी ५,२०० भावाने विक्री झाला. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांदा प्रतिकिलो ६० रुपयांच्या पुढे गेल्याने देशातील ग्राहकांना कांदा रडवणार असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जाते. मात्र यावर्षी कांद्याच्या मुख्य उत्पादक क्षेत्रालाच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. त्यामुळे कांदा उत्पादनामध्ये ३० ते ३५ टक्के परिणाम झाल्याने बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासूनच आवक घटली आहे. सध्या चांगल्या प्रतीचा कांदा केवळ २० टक्के येत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने दरात वाढ होऊ लागली आहे.

केंद्राचे खरेदीचे आदेश
देशातील मेट्रो सिटीमधील किरकोळ बाजारात कांदा ६० रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने मिनिरल्स अँड मेटल्स ट्रेड काॅर्पोरेशन लिमिटेड (एमएमटीसी)ला १० हजार टन कांदा आयात करण्यास सांगितले आहे. परंतु मागणीच्या तुलनेत ही आयात तोकडी आहे.
अशी आहे स्थिती
1. कांदा दरवाढीची परिस्थिती अजूनही सुमारे वीस ते पंचवीस दिवस राहण्याचा अंदाज व्यापारी आणि तज्ज्ञ वर्तवत आहेत.

2. सध्या कर्नाटकमध्ये कांद्याची आवक वाढत असल्याने महाराष्ट्रातील कांदा दरावर त्याचा परिणाम होऊ शकतो. परंतु त्या भागात पुन्हा पाऊस बरसला तर त्याचा परिणाम कांद्यावर होण्याची शक्यता आहे.

3. पावसाच्या ओढीमुळे लेट खरीप हंगामालादेखील फटका बसण्याची शक्यता अाहे. कांदा लागवडीसाठी सध्या रोपे तयार असून पाऊसच नसल्याने कांदा लागवड होऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांची रोपे वाया जाण्याची भीती आहे.
आवक वाढणार आहे
कर्नाटकमध्ये १५ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात कांदा आवक वाढणार आहे. तसेच कर्नाटकमध्ये ३० टक्के कांद्याचे अधिक उत्पादन होण्याची शक्यता असल्याने दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. - विकास सिंग, कांदा निर्यातदार
सध्या ४००० रुपये प्रतिक्विंटल दर
कर्नाटक येथील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी ७० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे यापेक्षा अधिक दर जाण्याची शक्यता नाही. सध्या ४००० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.
महेंद्रभाई ठक्कर, व्यापारी
भविष्यात दर वाढतील
केंद्राने दहा हजार टन कांद्याची त्वरित आयात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, देशाची मागणी आणि आयात यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात दर वाढतील.
- नानासाहेब पाटील, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती