आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Onion Rate Issue Farmer Agitation In Lasalgaon Nashik

निर्यातमूल्य घटूनही कांद्याचा वांधा; लासलगावला लिलाव पाडले बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - कांद्याच्या भावात घसरण होऊ लागल्याने शेतकर्‍यांनी एकजूट दाखवत पुन्हा एकदा कांदा लिलाव सोमवारी बंद पाडले. लासलगाव बाजार समितीत सुमारे 66 वाहनांतील कांद्याचा लिलाव झाल्यानंतर भाव 1116 रुपयांपर्यंत घसरल्याने शेतकर्‍यांमध्ये संतप्त झाले. त्यांनतर लिलाव बंद पाडण्यात आले.
मागील दोन सप्ताहांपूर्वी निर्यातीचे दर जादा असल्याचे कारणाने भाव घसरत असल्याने बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शेतकर्‍यांनी तीन वेळा बंद पाडले होते. त्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातमूल्याचे दर आता केवळ तीनशे पन्नास डॉलर प्रति टन केल्याने भाव वाढतील, अशी आशा असताना, मात्र त्याउलट परिस्थिती होउन बाजारभावात जास्त घसरण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन लिलाव बंद पाडल्यानंतर बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी शेतकर्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. पाटील यांनी आपण शेतकर्‍यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगून लिलाव जर बंद राहिले तर आपलेच नुकसान होणार असल्याने लिलाव सुरू ठेवण्याचे आवाहन केले. मात्र, बराच काळ शेतकर्‍यांमध्ये एकमत न झाल्याने सुमारे तीन तास बाजार लिलाव बंदच होते.
संतप्त शेतकर्‍यांचा रास्ता रोको
कांदा दरात घट झाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी जिल्ह्यात रास्ता रोको करुन लिलावही बंद पाडले होते. निर्यातमूल्य रद्दच करा, अशी मागणी करीत शेतकरी रोष व्यक्त करत होते. रास्ता रोको आणि लिलाव बंद असल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. मंगळवार रोजी असलेला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा नाशिक दौरा वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकर्‍यांनी उमराणे, येवला, सटाणा, दिंडोरी, देवळा येथेही रास्ता रोको केला. कांदा लिलावासाठी मोठय़ा समजल्या जाणार्‍या पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा या बाजार समित्यांमधील लिलाव बंद पाडण्यात आला होता. उमराणे येथे रास्ता रोको सुमारे तीन ते चार तास चालल्याने वाहतूक कोंडी मोठय़ा प्रमाणात झाली होती, तर येवला येथेही रास्ता रोको केल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.