आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाऊक कांदा दरात 11 रु. प्रतिकिलोपर्यंत घसरण ; 10 समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड- राज्यात कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सात कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. त्यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात ११ रुपये प्रतिकिलोपर्यंत घसरण झाली. कांदा खरेदी विक्री क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेल्या लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, येवला आणि देवळा बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद होते. शुक्रवारी जिल्ह्यातील उर्वरित दहा बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू असून सुमारे ३० ते ३५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. 

नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव होणाऱ्या एकूण १५ बाजार समित्या असून प्रतिदिन सरासरी ८० ते ९० हजार क्विंटल कांदा खरेदी-विक्रीची उलाढाल होते. दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात कांदा दर हे २ हजार ७०० रुपयांपर्यंत गेले होते. व्यापारी कृत्रिम दरवाढ करीत असल्याचा संशय आल्याने केंद्र शासनाने व्यापाऱ्यांकडे असलेल्या साठ्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. 

पाकिस्तानमध्ये सध्या कांदा ८० ते ९० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने त्याचा परिणाम भारतातदेखील होऊ शकतो म्हणून केंद्र शासनाने अगोदरच दखल घेत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव, उमराणे, येवला या कांद्याची अधिक आवक असलेल्या बाजार समितीमधील व्यापाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले होते. सध्या प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमुळे कांदा उत्पादक, व्यापारी आणि किरकोळ ग्राहक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यांमुळे व्यापाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार या दोन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले आहे. मात्र ज्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांवर छापे पडले त्या ठिकाणीच शुक्रवारी लिलाव बंद होते. जिल्ह्यातील उर्वरित दहा बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सूत्राने सांगितले आहे. 

 उन्हाळ कांद्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तेजी येते. त्यामुळे यादरम्यान किरकोळ बाजारात कांदा ४० रुपये किलोपेक्षा अधिक दराने विक्री होतो. मात्र गतवर्षापासून कांद्याची आवक अधिक असल्याने कांदा हा २० ते ३० रुपयांपेक्षा अधिक दराने विक्री झालेला नाही. तसेच पंधरा दिवसांत लाल कांद्याची आवकही वाढणार असल्याने कांद्याचे दर  प्रतिक्विंटल १००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 
 
किरकोळ बाजारात कांदा २० रुपये किलो  
कांदा व्यापाऱ्यांवर छापे पडल्यामुळे बाजार समितीमधील लिलाव बंद राहतील यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी समितीमध्ये आणला नाही. त्यामुळे शुक्रवारी ज्या बाजार समित्या सुरू होत्या त्या ठिकाणीही जेमतेमच आवक असल्याचे कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार समिती बंदचा किरकोळ बाजारात अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. 
 
किमती वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज
नाशिक येथील कांदा संशोधक डॉ. सतीश बांेडे यांनी सांगितले की, या छापेमारीमुळे किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या नाशिकमध्ये किरकोळ बाजारात २० रुपये किलोने कांद्याची विक्री होत आहे. आगामी १५ दिवसांत लाल कांद्याची आवक वाढणार असून त्यामुळे घाऊक बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात राहतील.
 
बातम्या आणखी आहेत...