आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एसएससी’ला उमेदवार २३०४, हजर फक्त ८४

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रसरकारच्या अखत्यारित येणाऱ्या विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे (एसएससी) दरवर्षी अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. प्रशासकीय सेवेतीलच वर्ग ‘ब’ ‘क’ या पदांसाठी रविवारी (दि. १२) शहरांतील सहा केंद्रांवर स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेसाठी इतर शहरांतील उमेदवारांना नाशिकचे केंद्र मिळाल्याने एकूण उमेदवारांपैकी तब्बल २२२० उमेदवारांनी दांडी मारली असून, केवळ ८४ उमेदवारांनीच परीक्षा दिली आहे. विशेष म्हणजे, इतर राज्यांतील उमेदवारांनाही नाशिकचे केंद्र मिळाले होते.

केंद्र सरकारच्या अखत्यारितील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी भारत सरकारने १९७५ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनची स्थापना केली. प्रशासकीय सेवेतील अराजपत्रित वर्ग ‘ब’ वर्ग ‘क’ यांमधील सर्व पदांकरिता स्पर्धात्मक परीक्षांद्वारे गुणवत्ताधारक व्यक्तींची निवड या आयोगाच्या माध्यमातून केली जाते. वर्ग ‘अ’मधल्या पदांकरिता कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगावर आहे. त्याखालील सर्व पदांसाठीच्या नियुक्त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच करते. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे विविध पदांसाठी रविवारी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी शहरातील मराठा हायस्कूल (२ केंद्र), सारडा कन्या विद्यालय, आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, नाशिकरोड येथील जे.डी.सी. बिटको स्कूल, सिडकोतील ग्रामोदय विद्यालय या केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परंतु, या परीक्षेसाठी एकूण २३०४ उमेदवारांपैकी २२२० उमेदवारांनी दांडी मारली, तर परीक्षेसाठी ८४ उमेदवारच हजर होते. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परीक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी २१५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

एकीकडे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढत असतानाच तसेच एकंदरच स्पर्धा परीक्षेकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल वाढत असतानाच केंद्रीय सेवेत जाण्यासाठी महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेतील पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या स्फाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेला अशाप्रकारे उमेदारांनी दांडी मारणे ही बाब अनाकलनीय असल्याचे म्हटले जात आहे.

याचप्रमाणे सनदी अधिकारी पदाच्या नोकरीचे मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये आकर्षण असल्यानेही केवळ क्लार्क पदासाठीच्या अशा परीक्षांकडे उमेदवारांनी पाठ फिरवली असावी, असे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

या पदांसाठी परीक्षा
केंद्रसरकारच्या अखत्यारित येणारी मंत्रालये, आयकर विभाग, टपाल विभाग, सीबीआय, सेंट्रल एक्साइज कस्टम्स, बीएसएफ, सीआयएसएफ या विभागांमधील वर्ग वगळता इतर सर्व नियुक्त्या एसएससीच्या शिफारशीने होतात. प्रशासकीय सेवेतील सहायक, निरीक्षक, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, डिव्हिजनल अकाउंटंट, सबइन्स्पेक्टर्स अशा विविध पदांसाठी एसएससीची स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात आली.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कल कमीच
स्टाफसिलेक्शन कमिशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत बिहार उत्तर प्रदेश या दोन राज्यांतून सर्वाधिक उमेदवार प्रविष्ट होत असतात. त्या तुलनेत महाराष्ट्रातील युवक या परीक्षेसाठी फारसे इच्छुक नसतात. तसेच, अनेकदा या परीक्षांविषयी विद्यार्थ्यांना योग्य वेळी माहितीच मिळत नाही. परीक्षार्थींचा कल एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षांकडेच जास्त असतो. या परीक्षेत गणित, बुद्धिमत्ता इंग्रजी या विषयांची काठिण्य पातळी कमी असली तरी या परीक्षेकडे कल कमीच राहतो. डॉ.जी. आर. पाटील, स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शक