आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: बीडमध्‍ये 2.86 लाख खातेदार शेतकरी, कर्जमाफीसाठी केवळ 9 हजार अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर २४ जुलैपासून सुरू झालेल्या अाॅनलाइन कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत अाहे. येथे २६ दिवसांत ६० ते ६५ % म्हणजेच अनुक्रमे ८० हजार ७१५ व ८४ हजार ५६५ शेतकऱ्यांनी अाॅनलाइन अर्ज केले.
 
मात्र, धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी २०१७ पासून आतापर्यंत सर्वाधिक ११५ शेतकरी अात्महत्या झालेल्या बीड जिल्ह्यात अातापर्यंत केवळ ९ हजार ७८४ शेतकऱ्यांनीच कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले अाहेत. या जिल्ह्यात खातेदार शेतकऱ्यांची संख्या २ लाख ८६ हजारावर आहे. मराठवाड्यात संवेदनशील जिल्ह्यातच ही स्थिती पाहायला मिळते अाहे.
 
मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हाच मुद्दा कर्जमाफी देण्याच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता. यावर  ‘कर्जमाफी दिली तर एकही शेतकरी अात्महत्या करणार नाही याची खात्री देता का?’ असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी विराेधकांना विचारला हाेता. त्याला प्रत्युत्तर देत कर्जमाफीनंतर अशा अात्महत्या हाेणारच नाहीत, असे खुले अाव्हान विराेधकांनी दिले होते. अखेर अांदाेलनापुढे झुकत सरकारने दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान याेजना -२०१७’ जाहीर केली.
 
बीडमध्ये खासगी कर्ज, बंद असलेली जिल्हा बँक अडचणीची
- बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी अात्महत्या झाल्या असल्या तरी या जिल्ह्यात बंद असलेली जिल्हा सहकारी बँक आणि त्यामुळे सावकारी कर्जाचा पाश, खासगी वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज ही कारणे कर्जमाफीसाठी पात्रतेत अडचणी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
- ऑनलाइन अर्ज भरताना कर्जखात्याचे बँक स्टेटमेंट द्यावे लागते. ते लवकर शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही.
- ग्रामीण भागात नेट कॅफे व इंटरनेट सुविधांचा अभाव. शिवाय नेट कॅफेतून अर्ज भरला आणि तो योग्य भरला गेला नाही तर कर्जमाफी मिळेल की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना जिल्हा किंवा तालुक्याचे ठिकाणी जावे लागत असल्याने व कागदपत्रे मिळवताना अडचणी येतात. त्यामुळे ऑफलाइन अर्ज भरणे शेतकऱ्यांना सोयीचे वाटते.
- अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी अद्याप जागृतीचा अभाव आहे.
 
ही अाहे सध्याची स्थिती
२४ जुलै ते १८ अाॅगस्टपर्यंत भरल्या गेलेल्या ऑनलाइन कर्जमाफी अर्जांची अाकडेवारी पाहता नाशिक जिल्ह्यात १ लाख २५ हजार पैकी ८० हजार ७१५ शेतकऱ्यांनी तर अहमदनगर जिल्ह्यात ८४ हजार ५६५ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठीचे अर्ज सादर केले अाहेत. मराठवाड्यात अाैरंगाबाद जिल्ह्यातून ४२ हजार ६७७ तर अमरावतीतून केवळ ६ हजार ८३, आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यातून ९ हजार ७८७ अाणि यवतमाळ जिल्ह्यातील १२ हजार ६३ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले अाहेत.

ऑनलाइनमध्ये अडचणी
राज्यात २४ जुलैपासून शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज घेण्यात येत आहेत. मात्र सुरुवातीला सर्व्हर डाऊनसारख्या अडचणी आणि नंतर पती अाणि पत्नी या दोघांचेही अाधार कार्ड सक्तीचे केल्यामुळे अनेकांना अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या.
बातम्या आणखी आहेत...