नाशिक- पावसाने ओढ दिल्यामुळे नाशिक शहरात सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा होणार असून, यात सिडको व नाशिकरोड भागातील काही जलकुंभांतून मध्यरात्रीपासून तर पहाटेपर्यंत पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नाशिककरांचा रात्रीचा दिवस होणार आहे.
सध्या सिडको व सातपूर वगळता पंचवटी, नाशिक-पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिकरोड भागात दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा होतो. कपातीमुळे चारही उपनगरांत एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे. नाशिकरोड विभागात पहाटे 5 वाजेपासून दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल. भीमनगर जलकुंभातून गोरेवाडी व शास्त्रीनगर येथे पाणीपुरवठा होत असून, रात्री 1 ते पहाटे 3.30 वाजेपर्यंत वितरणाची वेळ असेल. सिडको भागात सामान्यत: चोवीस तास टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा होणार असून, यात शिवाजी चौक, लेखानगर परिसरात पहाटे 4 वाजेपासून पाण्यासाठी नागरिकांना, विशेष करून गृहिणींना उठावे लागेल. सातपूर भागात पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल.
काही भागात दुपारी 4 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत पाणी असेल. नाशिक पूर्व भागात पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल तसेच काही भागात सायंकाळी 7.45 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी येणार आहे. नाशिक पश्चिम अर्थातच रविवार कारंजा, शालिमार, एन. डी. पटेलरोड, मल्हारखाण, अशोकस्तंभ, भद्रकाली, जुने नाशिक परिसरात पहाटे 5 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पाणी असेल. कॉलेजरोड, शरणपूररोड, गंगापूररोड, टिळकवाडी, सिटी सेंटर मॉल परिसरात सायंकाळी पाणीपुरवठा होईल. पंचवटी भागात पहाटे 5 ते दुपारी 12 तसेच काही भागात सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा होईल.
दररोज 60 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. सद्यस्थितीत ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा असून, पावसाची चिन्हे नसल्यामुळे पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. साधारण 15 टक्के पाणीकपात झाली असून, दिवसाला 60 दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत होणार आहे.