आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात उघड्या वीजतारांनी घेतला बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - घरासमोरील उघड्या वीजतारांना स्पर्श झाल्याने बुधवारी पवननगर परिसरात एका व्यापार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यातच ठाण मांडून प्रशासनाचा निषेध केला. सिडकोतील सर्व उघड्या वीजतारा भूमिगत कराव्या, अशी मागणी त्यांनी केली.

रायगड चौकातील गायत्री कलेक्शनचे मालक संजय वसंत कोठावदे (वय 49) हे पावसामुळे पडलेला दुकानाचा बोर्ड सरळ करीत असताना घराच्या गच्चीवरून गेलेल्या 11 केव्ही उच्च दाबाच्या वीज तारेचा बोर्डला स्पर्श झाला. त्यात वीजप्रवाह उतरून कोठावदे यांना जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


मुलगी सासरी गेली अन् पित्याचाही निरोप
कोठावदे यांच्या मुलीचा 13 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मंगल कार्य निर्विघ्नपणे संपन्न झाल्याच्या आनंदात सर्व कुटुंब होते. मुळाला आलेली मुलगी मंगळवारीच सासरी गेली. मुलगी जाताना डोळ्यात पाणी आलेल्या कोठावदे यांच्या मृत्यूने कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

मदतीची मागणी
कोठावदे कुटुंबीयांना प्रशासनाने दहा लाखांची मदत करावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शहराध्यक्ष संतोष सोनपसारे यांनी केली आहे. उघड्या वीजतारांच्या संदर्भात प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास परिषदेतर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.


.. तर आंदोलन करू
सिडकोत उघड्या वीजतारांचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार प्रशासनाकडे त्या भूमिगत करण्यासाठी पाठपुरावा करतो आहोत. तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करू. तानाजी जायभावे, नगरसेवक


किती बळी घेणार ?
सिडको परिसरात अशा प्रकारची ही चौथी-पाचवी घटना आहे. अनेक नागरिकांचा यात विनाकारण बळी गेला आहे. प्रशासन आता तरी कारवाई करणार का? की पुन्हा बळी जाण्याची वाट पाहत बसणार आहे? मुकेश शहाणे, सामाजिक कार्यकर्ते
याला जबाबदार कोण?
संजय कोठावदे यांच्या बळीला जबाबदार कोण? आम्ही प्रशासनाला याचा जाब विचारला तर अधिकारी एकमेकाकडे बोट दाखवतात. तेव्हा जबाबदारी वीज मंडळाची की महापालिकेची ? असे प्रकार पुन्हा घडू नयेत. योगेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते


पुन्हा असे घडू नये
कोठावदे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. पुन्हा असा प्रकार न घडण्यासाठी कडक उपाययोजना हव्यात. नागरिकांनी व प्रशासनाने दक्षता घ्यावी. या समस्येचा साकल्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भास्कर महाजन, मृताचे नातेवाइक