आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Open University Convocation To Be On New Academic Year

मुक्त विद्यापीठाचे पदवीप्रदान सोहळा नवीन शै‍क्षणिक वर्षात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कुलगुरूंच्या उपस्थितीअभावी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा पुढे ढकलण्यात आलेला दीक्षांत सोहळा अखेर जूनमध्येच घेण्याचे निश्चित झाले आहे. दीक्षांत सोहळ्याला प्रदान केल्या जाणार्‍या प्रशस्तिपत्रकांची फेरछपाई आणि संबंधित बाबींवर पुन्हा खर्च करावा लागू नये, या उद्देशानेच पदवीप्रदान सोहळा नवीन शैक्षणिक वर्षातच करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे खात्रीलायकरित्या समजते.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत सोहळा 23 फेब्रुवारीला होणार होता. त्या सोहळ्याच्या प्रशस्तिपत्रक छपाईपासून पत्रिका वाटप आणि मंडप उभारणीपर्यंतची सर्व कामे झाल्यानंतर अचानकपणे तत्कालीन कुलगुरू डॉ. कृष्णकुमार हे आजारी पडल्याने ते उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी कळविले. कुलगुरूच अनुपस्थित राहणार असल्याने तसेच त्याला कोणताही पर्याय नसल्याने प्रशासनाला कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. या सोहळ्याला प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीदेखील उपस्थित राहण्याचे कबूल केले होते. तेव्हापासून पुढे ढकलण्यात आलेला सोहळा कुलगुरूंच्या अनुपस्थितीत शक्य नसल्याने तो अनिश्चित काळासाठी पोस्टपॉन्ड झाला होता.

दरम्यान, 1 एप्रिलपासून आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांना राज्यपालांनी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने तो सोहळा कधी होणार याबाबत विद्यार्थ्यांना उत्सुकता कायम होती. नूतन प्रभारी कुलगुरूंच्या उपस्थितीत हा सोहळा शक्य असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले होते. डॉ. काकोडकर यांच्याशी पुन्हा संपर्क साधून त्यांची त्यापूर्वीची तारीख मिळविण्याचाही प्रशासनाचा विचार होता.


अधिकृत घोषणा बाकी
फेब्रुवारीतच होणार्‍या विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी छापलेल्या प्रशस्तीपत्रकांच्या खालील स्वाक्षरीच्या जागी तत्कालीन कुलगुरू डॉ. कृष्णकुमार यांचे नाव असल्याने तिथे प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांची स्वाक्षरी चालणार नाही. तसेच नवीन प्रभारी कुलगुरुंचे नाव छापायचे असेल, तर तेवढय़ा एकमेव कारणासाठी पुन्हा तितकेच प्रशस्तिपत्रक छापण्यासाठी सुमारे 10 लाखांहून अधिक खर्च येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हा सोहळा प्रभारी कुलगुरूंच्या कारकिर्दीत न करता नवीन शैक्षणिक वर्षात करण्याचे निश्चित झाले आहे. केवळ त्याबाबतची अधिकृत घोषणा विद्यापीठाकडून होणे बाकी आहे.


अनावश्यक खर्च नको म्हणून..
एप्रिल महिन्यातच दीक्षांत सोहळा घेण्याबाबत नियोजन केले जात होते. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने या प्रशस्तीपत्रांच्या फेरछपाईचा खर्च टाळण्यासाठीच दीक्षांत सोहळा जूनमध्येच घेण्याचा निर्णय झाला आहे. डॉ. अरुण जामकर, प्रभारी कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ