आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएस पाठवा अन् शहर करा कचरामुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापौरांसह नगरसेवकांना फैलावर घेतल्यानंतर आता ‘ऑपरेशन नाशिक क्लीन’च्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांपर्यंत जाण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नागरिकांना एका एसएमएसद्वारे परिसरातील कचरा, मलबा हटवण्याची सुविधा मिळणार आहे. सोमवारपासून पहिल्या टप्प्यात हे ऑपरेशन राबवले जाणार असून, मनसेच्या 39 नगरसेवकांच्या प्रभागांतील कानाकोपरा स्वच्छ करण्यास प्रारंभ होईल.

ठाकरे यांनी नाशिकमध्ये पक्षाची कामगिरी असमाधानकारक असल्याचे सुनावल्याने महापौरांपासून नगरसेवक-पदाधिकार्‍यांपर्यंत सारेच अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘राजगड’ कार्यालयात आमदार वसंत गिते यांनी नगरसेवकांना सक्रिय होण्याच्या टिप्स दिल्या. याच वेळी ‘ऑपरेशन क्लीन’ची आखणी करण्यात आली. याबाबत जनजागृतीसाठी फलक लावले जाणार आहेत. मनसेचे नगरसेवक आपल्या प्रभागाबरोबरच लगतचे प्रभाग दत्तक घेऊन तेथील स्वच्छतेकडेही लक्ष देणार आहेत.

मोकळ्या खाणी व धोकादायक विहिरींत टाकणार मलबा
यापूर्वी मनसेने शहर स्वच्छतेसाठी मोहीम हाती घेतली होती. त्यापुढचा टप्पा ‘ऑपरेशन नाशिक क्लीन’ आहे. गोळा केलेले बांधकाम साहित्य आदी व मलबा मोकळ्या खाणी, धोकादायक विहिरींमध्ये टाकून त्या बंद केल्या जातील. या मोहिमेवर नगरसेवक, आमदार व पदाधिकार्‍यांचे बारीक लक्ष असेल. - वसंत गिते, आमदार तथा प्रदेश सरचिटणीस, मनसे

अशी असेल मोहीम
नगरसेवक, नागरिक व पालिका अधिकार्‍यांना कनेक्ट करून ही मोहीम राबवली जाईल. महापौर, नगरसेवक व अधिकार्‍यांच्या मोबाइल क्रमांकांसह एक हेल्पलाइनही उपलब्ध करून दिली जाईल. या क्रमांकांवर नागरिकांनी एसएमएस करून कचरा व मलब्याची माहिती द्यावी. पालिकेची गाडी ते उचलून नेईल.

आमदारांचेही नियंत्रण
कचरा उचलण्याबाबत पालिका अधिकारी वा मनसेच्या नगरसेवकांकडून प्रतिसाद न मिळाल्यास थेट आमदारांकडे तक्रार करण्याची सुविधा दिली जाईल. त्यामुळे नगरसेवकांवर नियंत्रण राहील. आमदारांच्या हेल्पलाइनवर तक्रारीची सुविधा असेल.

.तर दंडात्मक कारवाई
मोहिमेंतर्गत मोकळ्या भूखंडांच्या मालकांना नोटीस पाठवून त्या जागा स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले जाणार आहेत. अस्वच्छता पसरवणार्‍या भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. नगरसेवक व अधिकार्‍यांना लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.