आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीआरटीएस नव्हे, बससेवेला विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- अहमदाबाद येथे बीआरटीएस प्रकल्प राबविलेल्या रस्त्यांची रुंदी पाहता नाशिकमध्ये नाशिकरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड तसेच दिंडोरीरोड व पेठरोड रस्त्यांवर हा प्रकल्प राबविणे अगदी सहज शक्य आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काम करणार्‍या आयटीडीपी या संस्थेने दिलेल्या प्रस्तावावरून सध्या सुरू असलेला विरोध हा प्रकल्पाला नसून, महापालिकेने बससेवा चालवावी की नाही, याबाबतीत असल्याने हा मुद्दा वगळता शहर वाहतुकीच्या अनुषंगाने प्रकल्प महत्वपूर्ण ठरू शकतो.

माजी महापौर विनायक पांडे यांच्या कार्यकाळात बससेवेचा प्रस्ताव महासभेत सादर झाला होता. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती व भविष्यात निर्माण होणार्‍या समस्या पाहता महासभेत प्रस्तावाला विरोध झाला. त्यानंतर तो आला नाही. आता प्रशासनाने बससेवेबरोबरच बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम) प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाविषयी प्रशासनाने गटनेते, महापौर व विरोधी पक्षनेत्यांसमोर प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यात विरोधीपक्षांनी प्रकल्प नव्हे तर बससेवेच्या अनुषंगाने विरोध केला होता.

सहा रस्त्यांवर प्रकल्प शक्य
नाशिकमधील सर्वाधिक वाहतूक असणार्‍या नाशिकरोड व त्र्यंबकरोडची रुंदी 45 मीटर इतकी आहे. तसेच गंगापूररोड, कॉलेजरोड, दिंडोरी व पेठरोड रस्त्यांची रुंदी 30 मीटरपेक्षा अधिक आहे. यामुळे रस्त्यांच्या रुंदीचा प्रश्नही निर्माण होत नाही. सहा मार्गांपैकी पहिल्या टप्प्यात नाशिकरोड, गंगापूररोड व त्र्यंबकरोडचा समावेश असून, त्यानंतर उर्वरित मार्ग तसेच मायको सर्कल ते सिडको या मार्गावर प्रकल्प साकारण्याचे प्रस्तावित आहे.

अद्याप निम्माच प्रकल्प
अहमदाबाद येथे सन 2008 पासून हाती घेण्यात आलेला बीआरटीएस प्रकल्प प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला आहे. सध्या 45 कि. मी. मार्गावर ही बससेवा सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यातील 90 कि. मी. चे काम अंतिम टप्प्यात आहे. आणखी पाच टप्पे बाकी आहेत. यामुळे संपूर्ण प्रकल्प सुरू झाल्यानंतर खर्‍या अर्थाने हा प्रकल्प आकार घेऊ शकेल. र्शेया गाडेपल्ली, विभागीय संचालक, आयटीडीपी

उत्पन्न वाढविण्यासाठी पर्याय
अहमदाबाद बीआरटीएसअंतर्गत सध्या दररोज दीड लाख प्रवाशांची वाहतूक होते. यामुळे खर्चापेक्षा दररोज प्रति कि. मी. चार ते पाच रुपयांचा तोटा सहन करावा लागत असला तरी ही तूट भरून काढण्यासाठी मार्ग व बसथांब्यांवर जाहिरातींतून उत्पन्न मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के सवलतीत स्मार्ट कार्ड उपलब्ध करण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. - अखिल ब्रह्मभट, उपमहाव्यवस्थापक, जनमार्ग बीआरटीएस कंपनी