नाशिक- रविवार पेठेतील काँक्रिटीकरणास सुरुवात झाली असून, या रस्त्याच्या रुंदीकरणासाठीही परिसरातील काही रहिवाशांनी आग्रही भूमिका घेतली आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास परिसराचा विकास होईल, असे या रहिवाशांचे म्हणणे आहे. तर, रुंदीकरणाऐवजी या रस्त्याला जोडणा-या रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे अशी भूमिका रुंदीकरण विरोधकांनी घेतली आहे. दरम्यान, रस्ता रुंद करण्यासाठी आजवर आठ ते दहा वास्तू मालकांनी स्वतःहून
आपल्या वास्तू मागे घेतल्या आहेत, तर काही रहिवासीदेखील रस्ता मोकळा करून देण्यास तयार आहेत.
गेल्या सिंहस्थात सरदार चौकातील अरुंद रस्त्यावर चेंगराचेंगरीच झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा रस्ता काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रुंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, लोकक्षोभाच्या भीतीने प्रशासन दोन पाऊल मागे सरले. काँक्रिटीकरण करताना रस्त्यात येणारी घरे व घराच्या भिंती पाडल्यास मोठा वाद होण्याच्या शक्यतेने आता रुंदीकरण टाळून सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे केवळ काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यादृष्टीने कामालाही सुरुवात केली आहे. वास्तविक, हा रस्ता गेल्या सिंहस्थापूर्वीच रुंद होणार होता. परंतु, परिसरातील रहिवासी व व्यापाऱ्यांनी त्यास तीव्र विरोध केल्याने प्रशासनाने नमती भूमिका घेत रुंदीकरणाला फाटा दिला. रविवारी रात्री या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला प्रारंभ झाला. त्यासाठी सुमारे १ कोटी १० लाखांची निविदाही मंजूर करण्यात आली आहे. रस्त्याचे कॉँक्रिटीकरण करताना एमएसईबीच्या केबल, जलवाहिन्या व भूमिगत गटारी दुतर्फा टाकण्यात येणार आहेत. रस्त्यात येणारे ओटे अथवा घरे पाडले जातील, असे प्रशासनाने यापूर्वी स्पष्ट केले होते. आता मात्र प्रशासनाने भूमिका बदलली आहे. त्यामुळे हा रस्ता काही ठिकाणी साडेसात, तर काही ठिकाणी सहा मीटर रुंदीचा असण्याची शक्यता आहे.
ट्रॅफिक जाम, काम बंद : रस्ता बंद करण्यात आल्याने सोमवारी सायंकाळच्या सुमारास वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला होता. तर, काम सुरू झाल्यानंतर काही वेळातच जेसीबी नादुरुस्त झाल्याने काम दिवसभर बंद होते.
अशी वळविण्यात येईल वाहतूक
अशोकस्तंभ ते रविवार कारंजादरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या काळात वाहतूक अशोकस्तंभ, मेहेर चौक, महात्मा गांधी रस्तामार्गे महाबळ चौकातील सिग्नलवरून रविवार कारंजा अशी वळविण्यात आली आहे.
मे महिन्यात होईल काम पूर्ण
रविवार पेठेतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. म्हणजे येत्या मे महिन्यापर्यंत हे काम पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे.
रुंदीकरणासाठी आमची तयारी
यापूर्वी 10 फूट रस्त्यासाठी जागा सोडण्याचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही रहिवाशांनी विरोध करून पाच फूट मागे जाण्याची तयारी केली होती. येथील विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातून आम्ही जागा मोकळी करून देण्यास तयार आहोत. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता काँक्रिटीकरण, रुंदीकरण करण्यात यावे. अन्यथा या काँक्रिटीकरणाला काही अर्थ उरणार नाही.- प्रसन्ना तांबट, स्थानिक रहिवासी