निफाड - आपले ध्येय सत्यात उतरवण्यासाठी करंजगाव येथे मोटार गॅरेजमध्ये काम करणा-या सुनील चांगदेव बोराडे या तरुणाने कोणतीही अद्ययावत यंत्रसामग्री नसताना रेसिंग कार बनवली आहे. हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रयत्न मात्र त्याला निधीचे पाठबळ नसल्यामुळे तसाच ठेवावा लागला आहे. दहावीनंतर किमान कौशल्याचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला. वडिलांचे निधन झाल्यानंतर मोठा भाऊ अनिल उदरनिर्वाहासाठी गॅरेजमध्ये कामासाठी जायला लागला. त्याच्याबरोबर काम करताना सुनीलला ही कल्पना सुचली. चार वर्षांपूर्वी त्याने चारही चाकांना इंजिनची ताकद मिळणारी जीप बनविली. त्याची ती गाडी अहमदाबादमधील एकाने विकत घेतली. तेव्हापासून त्याला सातत्याने प्रोत्साहन मिळत गेले.
दिवसा काम; रात्री कार बनवणे
इंटरनेटवरील फोटो पाहून त्याने कार बनवण्याचा ध्यास घेतला. जुनी मारुती इस्टिम खरेदी करून इंजिन त्याने दुरुस्त केले. चाचणी झाल्यावर गॅरेजमध्ये रेसिंग कारचा सांगाडा (चेसी) बनविला. मागील बाजूला इंजिन बसविले. दिवसभर गॅरेजमध्ये काम करून उरलेल्या पैशातून साहित्य आणून रात्र रात्र जागून त्याने ही कार बनविली आहे. त्याला बंधू अनिल व योगेश यांनी प्रोत्साहन दिले, तर गॅरेजमधील सहकारी संदीप डेर्ले, उमेश चिंतामणी यांनी सहकार्य केले.
अशी आहे कार
1300 सीसीचे इंजिन
200 किलोमीटर ताशी वेग
08 किलोमीटर प्रतिलिटर
07लाख रुपये खर्च
07 महिने अविश्रांत मेहनत