आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची उधळपट्टी अधिकाऱ्यांना भोवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका क्षेत्रात २० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर उधळपट्टी रोखण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहा भरारी पथके नियुक्त केली असली, तरी प्रत्यक्षात महिना उलटूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. कारवाई केल्यास विभागीय अधिकाऱ्यांवरच कारवाईचा प्रस्ताव आयुक्तांकडे ठेवला जाणार आहे.

पाणी कपात लागू करताना वाहने धुणारे सर्व्हिस सेंटर, जलतरण तलाव, नवीन बांधकामे, तसेच बांधकामासांठी दिलेल्या जुन्या पाणी जोडण्या बंद करण्याबरोबरच अगदी कोणी घराजवळ पाण्याचा सडा टाकत असेल वा उधळपट्टी करीत असेल, तर त्यांचे प्रथम प्रबोधन करून नंतर दंडात्मक कारवाईचे आदेश महापौर अशोक मुर्तडक यांनी दिले होते. त्यानुसार अशी कारवाई करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहाही विभागांत भरारी पथके नेमण्यात आली. प्रत्यक्षात या भरारी पथकांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे पाणीपुरवठा विभाग मेटाकुटीला आला आहे. प्रभागातील पाण्याच्या उधळपट्टीबाबत नगरसेवक तक्रारी घेऊन अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांना धारेवर धरीत आहेत. पवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कारवाईसाठी आदेश दिला, तर मनुष्यबळ अन्य कामाचे कारण काढून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यामुळे नाशिकमधील पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. ही बाब लक्षात घेत सोनवणे यांनी येत्या दोन दिवसांत प्रत्येक विभागीय अधिकाऱ्याला प्राधान्याने पाण्याची उधळपट्टी रोखण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई झाली, तर ठीक अन्यथा गंभीर दुर्लक्षाचा मुद्दा करून थेट आयुक्तांकडेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

बांधकामे हटवा...
सिडको,सातपूरला अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. या ठिकाणी भाडेकरू ठेवले जात असून, त्याचा परिणाम म्हणजे पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे जे मूळ सिडकोवासीय आहेत त्यांची गैरसोय होत असून, अनधिकृत बांधकामे हटविली, तर सर्वांना सहज मुबलक पाणी मिळेल, असे महापौर अशोक मुर्तडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा सांगितले.
बातम्या आणखी आहेत...